पिंपरी: हिंजवडी आयटी पार्कची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सक्षम पुणे मेट्रो 3 धावण्यास अवघा महिना बाकी आहे. मे 2026 अखेर यातील काही स्थानके प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. त्या कामाचा आढावा पीएमआरडीए प्रशासनाकडून नुकताच घेण्यात आला. या कामाला वेग आल्याची माहिती मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी दिली.
मेट्रो मे 2026 पर्यंत कार डेपो ते स्थानक क्र. 12 दरम्यान पहिल्या टप्प्यात धावण्याचे ध्येय समोर ठेवून ‘पीएमआरडीए’ प्रशासनाकडून आढावा घेण्यात येत आहे. प्रकल्पाचा सूक्ष्म आराखडा आणि प्रत्यक्ष कामाची नेमकी गती, याबाबत मुख्य अभियंता पठाण यांनी स्थानक क्र. 9 ला भेट देऊन पाहणी केली. कामाचा दर्जा आणि नियोजित कालमर्यादेचे पालन करण्यावर त्यांनी यावेळी विशेष भर दिला. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला पत्र देखील देण्यात आले आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात 12 स्टेशन धावण्यासाठी स्थानकाचे कामे देखील त्याच पटीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ज्या स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत, ती स्थानके पहिल्या टप्प्यात प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्याटप्याने इतर स्थानके सुरु करण्यात येतील, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.
प्रत्यक्ष पाहणीवर भर
हा प्रकल्प मे 2026 पर्यंत सुरू करण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री यांनी आदेश दिल्याने पीएमआरडीए प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे आता सूक्ष्म आराखड्यानुसार कामाच्या प्रगतीच्या पाहणीसाठी ‘ग््रााउंड झिरो’वर भर देण्यात आला आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून आढावा घेण्यात येत आहे.