तळेगाव स्टेशन: पुढारी वृत्तसेवा: इंदोरीजवळील कुंडमळा येथील वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.५) घडली होती. तरुणाचा मृतदेह त्याच दिवशी सापडला. तर तरुणीचा मृतदेह आज (दि. ७) सकाळी सापडला. रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे (वय २२, रा. चिंचवड), श्रेया सुरेश गावडे (वय १७, रा. चिंचवड) असे मृत तरुण- तरूणीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तरुण तरुणी गुरुवारी (दि.०५) सकाळी मित्रांसोबत कुंडमळा येथे फिरावयास आले होते. सकाळी ९ च्या सुमारास सेल्फीच्या नादात श्रेया गावडे पाय घसरुन पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी रोहन ठोंबरे पाण्यात उतरला असता वेगवान पाण्याच्या प्रवाहात दोघे वाहून गेले.
रोहन एका खासगी कंपनीत नोकरीस होता. श्रेया ११वी मध्ये शिकत होती. रोहनचा मृतदेह गुरुवारी दुपारच्या सुमारास मिळाला. श्रेयाचा मृतदेह आज सकाळच्या सुमारास मिळाला. याकामी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आणि आपदा मित्रचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, गणेश गायकवाड, राजेंद्र बांडगे, रवी कोळी, शुभम काकडे, सत्यम सावंत, मनिश गराडे, राजू सय्यद यांनी परिश्रम घेतले. तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांचे सहकार्य मिळाले.