पिंपरी: यंदाच्या गणेशोत्सवामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी वापरावरील बंदी उठविली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीचे बुकिंग करताना भाविकांकडून पीओपीच्या मूर्तींना पसंती दिली जात आहे.
दरवर्षी गणेशोत्सवामध्ये पर्यावरण संवर्धन आणि नदीप्रदूषण या कारणामुळे पीओपीऐवजी शाडूच्या मूर्तीचा वापर करावा, अशी जनजागृती केली जाते. नागरिकही काही प्रमाणात शाडूच्या गणेशमूर्तीना पसंती देताना दिसतात. मात्र, या शाडूच्या मूर्ती वजनाला जड आणि महाग असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पीओपीची मूर्ती घेणे परवडते. (Latest Pimpri News)
शाडूच्या मूर्ती तयार करण्यास जास्त कालावधी लागतो. तुलनेने पीओपीच्या मूर्ती जास्त तयार होतात. गणेशोत्सवावेळी ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याचे आवाहनदेखील कारखानदारांना असते. त्यामुळे कारखान्यामध्येदेखील 15 ते 20 टक्के मूर्ती शाडूच्या असतात इतर मूर्ती पीओपीच्या असतात.
मुंबई उच्च न्यायालयाने यंदाच्या माघी गणेशोत्सवापासून पीओपीवरील बंदीचा निर्णय लागू केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकांनी या वर्षी पीओपीवर बंदी असल्याचे आदेश काढले होते. मध्यंतरी मूर्तिकार संघटनेने मुंबईत मोठी बैठक घेतली.
या बैठकीत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी पीओपीने प्रदूषण होते की नाही, यासंदर्भात नेमका अभ्यास केला नसून आम्ही न्यायालयात जाऊ, असे आश्वासन दिले होते. मूर्तिकार संघटनेने पीओपीच्या मूर्ती वापरण्याच्या निर्णयाच्याविरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यानंतर राज्य सरकारने पद्मविभूषण प्राप्त वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि त्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण मंडळाला पाठवला. तो त्यांना मान्य झाल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले.
पीओपी मूर्तीला मागणी जास्त
शाडूच्या मातीच्या तुलनेत पीओपीच्या मूर्ती दणकट असतात. त्यांची वाहतूक सहज करता येते. वाहतूक करताना मोडतोड होत नाही. वजनाला हलकी असल्याने मोठ्या उंचीच्या मूर्ती तयार करता येतात. गणेश मंडळांकडूनदेखील पीओपीच्या मूर्तीची मागणी असते. या मूर्तींना फिनिशिंग चांगली करता येते.
पाहिजे तशी सजावट, रंगरंगोटी, दागिने घालता येतात. हल्ली मूर्तीना पोषाख, फेटा घातला जातो. त्यामुळे पीओपी मूर्तींना मागणी जास्त असते. पीओपी विरघळली तरी मातीमध्ये मिसळते. या मातीत जिप्सम असल्याने ही माती शेतात खतम्हणून वापरता येते. पीओपीला कारगीर मिळतात.
काय आहेत नियम
सुधारित नियमावलीनुसार छोट्या आकाराच्या पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्ती बनवण्यावर, तसेच त्यांची व्यावसायिक विक्री करण्यावर कोणतीही बंदी नाही. मात्र, त्यांचे विसर्जन हे केवळ कृत्रिम तलावातच करावे लागेल, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने 9 जून 2025 या दिवशी दिले. पीओपीवरील बंदी उठवताना न्यायालयाने पीओपीच्या प्रत्येक मूर्तीच्या मागच्या बाजूला लाल रंगाची खूण असणे अनिवार्य आहे, अशी अट घातली आहे.
शाडूकाम किचकट
शाडूच्या मूर्ती करण्यासाठी माती मिळत नाही. तसेच, कारागीरही मिळत नाही. मूर्ती तयार करण्यासाठी जागा जास्त लागते. मूर्तीची मोडतोड होते. मूर्ती परत बनविता येत नाही. एक कारागीर दिवसाला शाडूच्या दोनच मूर्ती करू शकतो. तर पीओपीच्या मूर्ती 20 ते 25 बनवता येऊ शकतात. यामध्ये शाडूच्या मूर्तीचे फिनिशिंग चांगल्या प्रकारे करता येते. पाहिजे तशी कलाकुसर करता येत नाही.
रंगरंगोटी करता येत नाही. मातीची मूर्ती थोडासा जार थक्का लागला तरी तुटते. शाडुच्या मूर्तीला लाकडी पाट लावावा लागतो. मूर्ती जास्त वजनाची असेल तर उचलताना तुटते. त्यामुळे दोन ते अडीच फुटांपर्यंतच बनविली जाते. शाडूची मूर्ती बनवायला कुशल कारागीरच लागतात. शाडूच्या मातीला चिकटपणा असल्याने मूर्ती विरघळल्यानंतर कुंड्यांमध्ये वापरता येत नाही.
न्यायालयानेदेखील यंदा पीओपी मूर्तींवरची बंदी उठविली आहे. पीओपीमुळे प्रदूषण होते की नाही यावर अभ्यास करण्यात आला आहे. तसेच मोडतोड होत असल्याने शाडूच्या मूर्तीची मागणी कमी असते. आमच्या कारखान्यात 5 हजार मूर्तीमध्ये दोनशे ते अडीचशे शाडूच्या मूर्ती असतात.- रवींद्र चित्ते (मूर्तिकार, ओम साई गणेश आर्टस व कला केंद्र)