Pimpri News: नववर्षाच्या सुरुवातीलाच शहर पोलीस दलात दुर्दैवी घटना घडली आहे. नाकाबंदी तपासणीसाठी जात असताना पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सुरेश गिरनार यांचा कार अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 1) पहाटे महाळुंगे येथे घडली. समोरून जाणार्या कंटेनरने अचानक लेन बदलल्याने गिरनार यांच्या कारची कंटेनरला धडक बसली. या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला आणि गिरनार यांचा जागीच मृत्यू झाला.
नाकाबंदी तपासणीदरम्यान अपघात
गिरनार हे एक वर्षांपासून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. वर्षाखेरीस नाकाबंदी आणि वाहतूक तपासणी सुरू होती. गिरनार हे महिंद्रा कंपनीजवळून जाताना समोरून आलेल्या कंटेनरने अचानक लेन बदलली. ज्यामुळे त्यांच्या कारने कंटेनरला जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे गिरनार यांचा मृत्यू झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले.
शिपाई ते उपनिरीक्षक
गिरनार हे पुणे शहर पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले होते. त्यांनी खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण करत 2016 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले. पिंपरी-चिंचवड पोलीस दलात काम करताना त्यांनी वाकड पोलिस ठाण्यात आणि नंतर महाळुंगे एमआयडीसी येथे सेवा दिली.
मूळ गावी अंत्यसंस्कार
गिरनार हे मूळचे धुळे जिल्ह्यातील होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आला. धुळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहर पोलीस दलावर शोककळा
वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस दलातील अधिकार्याच्या अपघाती मृत्यू झाल्याने पोलिस दलासाठी ही घटना दुःखद आहे.
पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार हे बंदोबस्त तपासणीसाठी खासगी वाहनाने जात असताना अपघात झाला. कंटेनरने अचानक लेन बदलल्यामुळे कारची धडक बसली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.- नितीन गीते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे पोलीस ठाणे.