पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील सांगवी पोलिस ठाण्याच्या बाहेरच एका पोलिस अंमलदाराचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र, वाढदिवसाचा हा जल्लोष राज्यात चर्चेचा विषय ठरला. मध्यरात्री मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी, रस्त्याच्या मधोमध गोंधळ आणि त्याचे ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करून व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे अखेर पोलिस आयुक्तांनी कडक कारवाई करत वाढदिवस साजरा करणाऱ्या चार पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे हे नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहेत तसेच, बर्थ डे बॉय प्रवीण पाटील आणि अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
सांगवी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार प्रवीण पाटील यांचा वाढदिवस होता. त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट पोलिस ठाण्याच्या बाहेरच मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी, जोरजोरात घोषणा आणि वाहनांच्या हॉर्नचा आवाज यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ निर्माण झाला.
वाढदिवसाचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. या जल्लोषाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. एका पोलिस ठाण्याबाहेरच अशा पद्धतीने शिस्त मोडली जात असल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिले.
"शिस्त मोडणाऱ्यांची गय नाही"
या प्रकरणावर बोलताना पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्पष्ट केले की, "पोलिस दलात शिस्त हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर पोलिसच कायदा मोडत असतील आणि अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असतील, तर जनतेला काय संदेश जाईल? अशा प्रकारची बेशिस्त वागणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही."