पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणअंतर्गत राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये अतिक्रमण निर्मूलन विभागातील तीन तर, अभियांत्रिक विभागातील एक महिला अधिकारी यांची बदली झाली आहे. तर, दोन अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत.
पीएमआरडीएमध्ये महसूल तसेच, शासनाच्या विविध विभागातून अधिकारी प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यात जमीन व मालमत्ता, अतिक्रमण निर्मूलन, विकास व परवानगी या विभागात नेमणुकीस आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचा समावेश असतो. (Latest Pimpri News)
दरम्यान, पीएमआरडीएमध्ये पोलिस विभागातून प्रतिनियुक्तीवर असलेले पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांची दोन दिवसांपूर्वी लातूर अधीक्षकपदी बदली झाली. त्यानंतर आता उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार या संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागातील उपायुक्त असलेले उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांची कोरेगाव, सातारा या ठिकाणी उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. तसेच, या विभागातील तहसीलदार सचिन म्हस्के यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, अभियांत्रिकी विभागातील उप अभियंता शीतल देशपांडे यांची ग्रामविकास विभाग, पुणे या ठिकाणी बदली झाली आहे. त्याच्या जागी स्नेहल अंबू या रुजू झाल्या आहेत.
दोन अधिकार्यांची सेवानिवृत्ती
पीएमआरडीएत रजू झाल्यानंतर दोन अधिकार्यांची सेवा संपल्यानंतर ते निवृत्ती झाले. त्यात काही महिन्यापूर्वीच जिल्हा पुरवठा अधिकारी पदावरून सहआयुक्त म्हणून रुजू झालेले संजय गायकवाड आणि अभियांत्रिक विभागातील एक अभियंता सेवानिवृत्त झाले.
विकास परवानगी विभागात फेरबदल
विकास परवानगी विभागात मोठ्या प्रमाणात फेरबदल केले असून, जवळपास 16 सहायक महानगर नियोजनकार यांचे विभाग बदलेले आहेत. त्यात गुंठेवारी, वेगवेगळे 9 तालुके, टीडीआर प्रकरणे, वृक्ष प्राधिकरण संबंधित कामे, मूल्यांकन प्रकरणे, वास्तुविशारद, आकाशचिन्ह या विभागातील अधिकार्यांची खांदे पालट केली आहे.