पंकज खोले
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखाडा अर्थात डीपी न्यायालयाने अंतिमतः रद्द केला. दरम्यान, यानंतर आता नव्या डीपीबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. तत्पूर्वी, राज्य शासनाच्या स्ट्रक्चर प्लानअंतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये रस्ते व इतर विकासकामांचा समावेश असेल. सद्यःस्थितीत बांधकामांना यापूर्वीच्या आराखड्याअंतर्गत मंजुरी देण्यात येणार असल्याचे नियोजन विभागाने स्पष्ट केले. (Pcmc Latest News)
पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा 30 जुलै 2021 ला प्रकाशित करण्यात आला होता; मात्र याविरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्या होत्या तसेच याविरोधात पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. राज्य शासनाने न्यायालयात डीपी रद्दचे प्रतिज्ञापत्र सादर केले. अखेर त्यानंतर आराखडा रद्द करण्यात आला तसेच त्याविषयीच्या आठ जनहित याचिकादेखील निकाली काढल्या.
दरम्यान, प्रारूप विकास आराखडा रद्द झाल्यानंतर रिजनल प्लान अंतर्गत कामे सुरू आहेत. त्यानुसार कामे आखली गेली. जुन्या झोनिंगनुसार प्रादेशिक नियोजनअंतर्गत रस्ते, विविध सुविधांची कामे सुरू होतील. राज्य शासनाकडून नोटिफिकेशन म्हणजेच सूचना
प्राप्त झाल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. तूर्तास झोन दाखले आणि यासबंधित पीएमआरडीए कार्यालयात आलेल्या नागरिकांना व अर्जदारांना माघारी पाठवले जात आहे.
हिंजवडी फेज 1 या ठिकाणच्या घरांवर रस्ते आरक्षण दाखवण्यात आले. त्याची माहिती मिळाल्यानंतर मी अनेकदा पीएमआरडीए, जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारल्या. आता विकास आराखडा रद्द झाला आहे; मात्र त्यासाठीची कागदपत्रे मिळण्यासाठी मला पीएमआरडीए कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. कागदपत्रे लवकर उपलब्ध करुन देवू, असे केवळ आश्वासन दिले जात आहे.नितीन गोटे, अर्जदार