पंकज खोले
पिंपरी: पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी केंद्र शासनाची नव्याने लागू केलेली (पीएम- वीबीआरवाय) अर्थात प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लाभदायी ठरत आहे. तरुणांना पहिल्या नोकरीसोबत केंद्र शासनाकडून 15 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात अशा पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या 87 हजार तरुणांना डीबीटीद्वारे प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे.
पिंपरी, चिंचवड तसेच, चाकण एमआयडीसीत लाखो कंपन्या, कारखाने आहेत. यात वर्षाकाठी शेकडो तरुण नोकरीसाठी अर्ज करतात. पहिली नोकरी करणाऱ्या कामगारांना 15 हजारांपर्यंत लाभ केंद्र शासनाच्या वतीने दिला जाणार आहे. गत वर्षभरात पिंपरी, चिंचवड व परिसरात 87 हजार जणांना त्याचा लाभ घेतला असून, नव्याने अर्ज करणाऱ्या तरुणापर्यंत (ईपीएफओ) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभाग पोचत आहे.
या योजनेअंतर्गत नवीन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने 15 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. ही रक्कम दोन टप्प्यांत, सहा महिन्याच्या अंतराने खात्यात जमा होते. 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत पहिली नोकरी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. आता या योजनेसाठी दीड वर्ष राहिले असल्याने अधिकाधिक या योजनेत समाविष्ट होण्यासाठी ईपीएफओ कार्यालकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, उत्पानद क्षेत्रासाठी हा लाभ अधिक सोईचा ठरणार असून, अतिरिक्त 2 वर्षे लाभ दिला जाणार आहे.
हिंजवडी येथे कार्यालय
पिंपरी, चिंचवड कार्यालयअंतर्गत चाकण, जुन्नर, विमानतळ रस्ता या भागाचा समावेश येतो. तर, नुकतेच हिंजवडी येथे नव्याने कार्यालय सुरू झाले आहे. त्यामुळे हिंजवडी व परिसरातील ग्रामीण भागातील पटट्यातदेखील अनेक कंपन्यांना या योजनांशी जोडण्यात आल्या आहेत.
कंपन्यांकडून प्रतिसाद मिळेना
ईपीएफओ कार्यालयाकडून पिंपरी-चिंचवड शहरास लगत असणाऱ्या कंपन्यांना या योजनेबाबत माहिती देण्यासाठी संपर्क साधला जात आहे; मात्र, अनेक कंपन्या याबाबत प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येत्या वर्षभरात ईपीएफओ कार्यालयास शहरातील सर्वच कंपन्यापर्यंत पोचावे लागणार आहे. त्याची कार्यवाही ईपीएफओकडून सुरू आहे.
नव्याने नोकरी करणारे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने त्याचा लाभ मिळत आहे. हा लाभ सर्व स्तरापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.सनत कुमार, प्रादेशिक आयुक्त, आकुर्डी, ईपीएफओ