पिंपरी: टेम्पोचालकाने आपला टेम्पो पिंपरी मार्केटमध्ये रस्त्यावर उभा केल्याने वाहतूक कोंडी झाली. टेम्पो बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून त्याने महिला वाहतूक पोलिसावर हल्ला केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 20) दुपारी एक वाजताच्या सुमारास शगुन चौकाजवळ, पिंपरी येथे घडली. (Latest Pimpri chinchwad News)
शरद अशोक कांबळे (25, रा. मांजरी खुर्द, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई जयश्री जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री जाधव या पिंपरी वाहतूक विभागात कार्यरत असून सोमवारी शगुन चौकात वाहतूक नियमनाचे काम करीत होत्या. दुपारी साडेबारा वाजता आरोपी शरद कांबळे टेम्पो घेऊन साई चौकाकडे जात होता.
त्याने खुशी इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर टेम्पो रस्त्यात थांबवला. त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण झाल्याने जाधव यांनी टेम्पो पुढे घेण्यास सांगितले. त्यावरून आरोपीने शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धाव घेत मारहाण केली. पोलिसांनी तत्काळ शरद कांबळे याला ताब्यात घेतले आहे.