परमेश्वर वाव्हळ
खराळवाडी: मे महिन्यात उन्हाची तीवता वाढल्याने शाळकरी मुले, महिला, नागरिकांची कडाक्याच्या उन्हापासून आराम मिळण्यासाठी तसेच ‘थंडा थंडा-कुल कुल’ राहण्यासाठी जलतरण तलावांकडे धाव घेत आहेत. पोहणे हा केवळ एक व्यायाम नसून, उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्याचा एक उत्तम उपाय मानला जात आहे. मे महिन्यात तापमानाचा पारा एक्केचाळीसवर गेल्यामुळे पिंपरी शहरातील कै. अण्णासाहेब मगर जलतरण तलावांवर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी पोहणाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.
सध्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने लहान मुले आणि तरुण पोहण्याचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे पिंपरीतील नेहरुनगर येथील कै. अण्णासाहेब मगर जलतरण तलावाकडे मफथंडाथंडा कुलकुल, उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी शाळकरी मुले, तरुणाची संख्या सध्या वाढत चालली आहे. या गर्दीला आवर घालण्यासाठी जलतरण तलावांवर अनुभवी जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.
सुरक्षेचे कडक नियम लागू केले आहेत. या जलतरण तलावाकडे स्वच्छतेची काळजी, पाण्याचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी व्हॅक्यूम क्लीनिंग आणि निर्जंतुकीकरण नियमित केले जाते. शहरातील वाढत्या तापमानात मनसोक्त पोहून उष्णतेवर मात करण्यासाठी जलतरण तलाव हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. तलावात स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, शॉवर रूम, पिण्याचे पाणी या सुविधा येथे आहेत, असे पोहोचण्यासाठी येणारे नागरिक सांगतात.
जलतरण तलावाच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात
या तलावाच्या देखरेखीसाठी सुरक्षारक्षक तैनात असतात. शिवाय एक सफाई कामगार आठ जीवरक्षक, सहा प्रशिक्षक या तलावाचे काम पाहतात. महिलांसाठी स्पेशल बॅच असतात. सकाळी दहा ते अकरा, सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत चालू असते. सकाळी सहा ते दहा, सायंकाळी पाच ते रात्री नऊ सर्व साधारण मिक्स बॅच असतात. महिला व पुरुष तिकीट सर्व साधारण जनरल ऑनलाईन बुकिंग वीस रुपये आहे. पुलाची क्षमता एका वेळी ऐंशी लोकांची आहे. पोहयला येत असल्यास महिन्याची फिस 500 रुपये, तर पोहयचे शिकायचे असल्यास महिन्याला 300 रुपये आहे.
तलावाकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तरी महापालिका प्रशासनाने जलतरण तलावाकडे येण्या-जाण्याचा रस्ता व्यवस्थित करावा.गणेश कांबळे, नागरिक
या तलावाचे पाणी रोज तपासणी केली जाते. पोहोण्याआधी शॉवरचे पाणी घेतले जाते. दुपारी कधीतरी पाण्याची कमतरता भासत असते. बाकी या जलतरण तलावाला मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध करावा. पुलाजवळ उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी निवारा शेड उभारावे.प्रसाद ढोके, व्यवस्थापक, कै. अण्णासाहेब मगर जलतरण तलाव, नेहरुनगर