Complaint Box Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri School Complaint Box: तक्रार पेट्या बसवल्या; मात्र तक्रारींची दखलच नाही! शाळा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे पालक नाराज

विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठीची व्यवस्था नावापुरतीच; पंधरा दिवसांतून तक्रार पेट्या उघडून कार्यवाही करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: विद्यार्थ्यांवरील अन्याय, मानसिक छळ, रॅगिंग, भेदभाव तसेच शाळेतील विविध समस्या विद्यार्थ्यांना निर्भयपणे मांडता याव्यात या उद्देशाने पिंपरी शहरातील शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्यात आल्या. मात्र, शहरातील काही शाळांमध्ये या तक्रार पेट्या केवळ नावापुरत्‍या राहिल्याची भावना पालकांकडून व्यक्त होत आहे. तक्रार पेट्यांची नियमित तपासणी होत नसल्यास विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे काय होते, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

विद्यार्थ्यांना एखादी समस्या थेट शिक्षक किंवा शाळा प्रशासनासमोर मांडताना संकोच वाटू शकतो. अशा वेळी तक्रार पेटी हा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि गोपनीय माध्यम ठरू शकतो. मात्र, तक्रार पेटी बसवून तिची वेळोवेळी तपासणी केली नाही, तर या उपक्रमाचा मूळ उद्देशच बाजूला पडण्याची शक्यता आहे.

काही विद्यार्थ्यांना तक्रार पेटीचा नेमका वापर कसा करायचा, कोणत्या प्रकारच्या तक्रारी त्यामध्ये नोंदविता येतात आणि तक्रार केल्यानंतर त्यावर कोणती कार्यवाही होते, याची पुरेशी माहिती नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती करून तक्रार पेटीची नियमित तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

पंधरा दिवसांनी तपासणीची आवश्यकता

तक्रार पेटी किमान पंधरा दिवसांतून एकदा उघडून त्यातील तक्रारींची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची गोपनीयता राखून त्यावर वेळेत चौकशी व आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच शिक्षण विभागाने शाळांची वेळोवेळी तपासणी करून तक्रार पेटीचा प्रत्यक्ष वापर होत आहे की नाही, याची पडताळणी करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

तक्रार पेटी बसविणे हा चांगला उपक्रम आहे. मात्र, ती केवळ शोभेची वस्तू ठरू नये. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींवर गोपनीय पद्धतीने आणि वेळेत कारवाई झाली पाहिजे. प्रत्येक महिन्याला तक्रार पेटी उघडून त्यातील तक्रारींचा आढावा घेणे आवश्यक आहे.
पालक
आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. तक्रार पेटीची नियमित तपासणी केली जाते. कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तिची गोपनीयता राखून आवश्यक ती चौकशी व योग्य कारवाई केली जाते. विद्यार्थ्यांना निर्भयपणे आपले प्रश्न मांडता यावेत, यासाठी शाळा कटिबद्ध आहे.
सुरेखा जाधव, मुख्याध्यापिका, एच. ए. प्राथमिक शाळा, पिंपरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT