पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात होणारी चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलिसांनी अँटी चेन स्नॅचिंग मोहिमेस सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत 8 ते 14 जुलै या कालावधीत दररोज संध्याकाळी सहा ते रात्री दहाच्या दरम्यान शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून, संशयित दुचाकीस्वारांची कसून तपासणी करण्यात येणार आहे. रस्त्यावर तोंडाला रुमाल बांधून, हुडी घालून किंवा स्पोर्ट्स बाईकवरून भरधाव फिरणार्या तरुणांची विशेष झडती घेण्यात येणार आहे. (Latest Pimpri News)
या मोहिमेसाठी परिमंडळ 1, 2 आणि 3 चे पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी वेगवेगळ्या नाकाबंदीत सहभागी होणार आहेत. तपासणीदरम्यान वाहनचालकांचा परवाना आणि गाडीची कागदपत्रे तपासली जातील.
संशयास्पद वाटल्यास त्यांची चौकशीही केली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी वरिष्ठ अधिकारी स्वतः हजर राहणार असून गस्त आणि पेट्रोलिंग पथक संध्याकाळी साडेपाचपासूनच अलर्ट मोडवर असणार आहेत.
नागरिकांना आवाहन
या मोहिमेमुळे नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असा विश्वास पोलिस आयुक्तालयाकडून व्यक्त करण्यात येत आहे. शहरात रात्री फिरताना भीती वाटू नये, यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाकाबंदीत काय-काय होणार?
रस्त्यावरील प्रत्येक वाहन थांबवून तपासणी
ड्रायव्हिंग लायसन्स आणि कागदपत्रांची पाहणी
सीसीटीव्ही व मोबाईल तपासणी यंत्रणा सक्रिय
ट्रॅफिक पोलिस आणि गुन्हे शाखेचा समन्वय
महिलांच्या दागिन्यांची चोरी रोखण्यासाठी तात्काळ कारवाई
गुन्ह्यांची आकडेवारी काय सांगते?
जानेवारी ते जून : 2025
दाखल चेन स्नॅचिंग गुन्हे : 39
उघड झालेले गुन्हे : 30
जानेवारी ते जून 2024
दाखल : 43
उघड : 30
शहरातील काही भागात रात्रीच्या वेळेस चेन स्नॅचिंग घटना घडत असल्याचे समोर आले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. संशयास्पद हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जाईल. नागरिकांनीदेखील पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.- शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी- चिंचवड.