पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पाच लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसांमध्ये पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांच्या सातबारा, प्रॉपर्टी कार्ड प्राप्त करण्यात येणार आहेत.
तलाठ्यांना पत्रव्यवहार करून येत्या दहा दिवसांत थकीत रकमेचा बोजा संबंधिताच्या सातबारा उताऱ्यावर चढविण्यात येणार आहे, असे करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सोमवारी (दि.७) सांगितले.
मालमत्ताधारकांकडून मागील वर्षापर्यंतचा ७२५ कोटींचा थकीत मालमत्ताकर बाकी आहे. आंशिक कर ४५ भरलेल्यांकडून कोटी ७८ लाखांचा थकीत कर येणे बाकी आहे. चालू वर्षीच्या मागणीपैकी २३३ कोटींचा कर थकीत असून, ८४ कोटी ८ लाखांचा कर आंशिक कर भरलेल्यांकडून येणे बाकी आहे.
यामध्ये पाच लाखांहून अधिक रक्कम असलेल्या २ हजार २२ थकबाकीदारांकडे तब्बल २८० कोटी ६८ लाख रुपयांचा कर थकीत आहे. या थकीत मालमत्तांधारकांनी येत्या दहा दिवसांमध्ये रकमेचा भरणा न केल्यास संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत.
मालमत्ताकर भरणार्या थकबारीदारांची संख्या मोठी आहे. त्यामधील पाच लाखांहून अधिक थकीत रक्कम असणार्या थकबाकीदारांच्या सातबारा उतार्यावर येत्या दहा दिवसांमध्ये थकीत रकमेचा बोजा चढवला जाणार आहे. येत्या दहा दिवसांत आपल्या कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.