पिंपरी: मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी शहर परिसरातील बाजारात मकर संक्रांतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. तिळगूळ बनविण्यासाठी आणि हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठीचा उत्साह महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. महिलांनी वाणामध्ये ओटीचे साहित्य, बिब्याची माळ, खाऊची पाने, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, डहाळे, ऊस, बोर घालून, पूजन करण्यासाठी सुगड खरेदी केले.
संक्रांतीला तिळाचे महत्त्व आहे. संक्रातीच्या दिवशी तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची वडी, तिळाचे लाडू, बाजारात तिळगुळाचे अनेकविध प्रकार उपलब्ध असल्याने त्यांच्या खरेदीसाठी महिलांनी पसंती दिली. रेडिमेड तीळगुळासोबतच गुलाब रेवडी, गुळाची रेवडी, साखरेची रेवडी, चिक्की तसेच काटेरी हलवा खरेदीत महिला व्यग््रा दिसून आल्या.
याशिवाय संक्रांतीला विशेष मान असणारे हलव्याचे दागिने बाजारामध्ये विक्रीसाठी आले आहेत. मुकुट, बाजूबंद, अंगठी, झुमके, गजरे, मोहनमाळ, मंगळसूत्र, बांगडी, नथ, हार, नेकलेस अशा विविध प्रकारच्या हलव्याच्या दागिन्यांची महिलांनी खरेदी केली. तसेच बाजारामध्ये कपड्यांच्या दुकाना काळ्या रंगाच्या साड्या, लहान मुलींचे खणाचे इरकल आणि जरीचे फॉक खरेदी केली. संक्रातीनिमित्त बोरांनादेखील मागणी वाढली होती.
संक्रांतीदिवशी सुवासिनी सुगडामध्ये या हंगामात येणारे धान्य, भाज्या उसाचे तुकडे, गूळ, तीळ घालून संक्रांतीची पूजा करतात. सुवासिनींना हळदी कुंकवासह वाण देतात. त्यामुळे महिलांसाठी हा सण विशेष आनंदाचा असतो. घरोघरी तिळगूळ तसेच हलवा, तिळाचे लाडू केले जातात. घराघरांत संक्रांतीचा हलवा बनवण्याची घाई सुरू झाली आहे. बाजारात संक्रांतीचे सुगड खरेदीसाठीही महिलांची गर्दी झाली होती.
शहरातील भाजीमंडईत गर्दी
भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या खरेदीसाठी शहरातील बाजारात तोबा गर्दी झाली होती. शहरातील सर्व भाजी मंडईंमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्या उपलब्ध होत्या. भोगीसाठी शहरातील भाजी मंडईत हरभरा, वाटाणा, वांगी, कांद्याची पात, गाजर, मेथी आदी भाज्यांची हजेरी लागली होती. रात्री उशिरापर्यंत शहरातील भाजी मंडईत गर्दी होती. यासह संक्रांत सणाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून आली. मंडईत बाजरी, राळ्याचे तांदूळ, गाजर, वाटाणा, वांगी, हरभरा, पातीचा कांदा यासह अन्य भाज्यांची विक्रीसाठी आल्या होत्या. बाजरीचे तयार पीठही विक्रीसाठी उपलब्ध होते.