AI Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Industry AI Impact: पिंपरी उद्योगनगरीत कामगार टंचाई; एआयमुळे व्यवसायांचे स्वरूप बदलतेय

कुशल कामगारांची कमतरता आणि वाढत्या खर्चामुळे उद्योजकांचा एआयकडे कल; तंत्रज्ञान ठरतेय नवा आधार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: एकेकाळी उद्योगनगरीतील कारखाने, स्टुडिओ, जाहिरात संस्था, प्रिंटिंग युनिट्‌‍स आणि सेवा क्षेत्रातील व्यवसायांमध्ये कामगारांची गर्दी दिसायची. काम वाढले की कर्मचारी वाढवले जायचे. मात्र, आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. उद्योग क्षेत्रासमोर सर्वांत मोठे आव्हान म्हणून कामगार टंचाई उभी राहिली असून, अनेक उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याची तक्रार आहे. कामगार उपलब्ध नसणे, कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता, वाढता खर्च आणि वेळेचे बंधन यामुळे अनेक व्यावसायिकांनी आता तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे साधन अनेक व्यवसायांसाठी संकटमोचक ठरत आहे.

इंधन टंचाईचा फटका

उद्योगनगरीतील अनेक लघु व मध्यम उद्योगांना कामासाठी मनुष्यबळ मिळवताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी कर्मचारी काही महिन्यांतच नोकरी सोडतात. तर, काही ठिकाणी आवश्यक कौशल्य असलेले कामगारच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे उत्पादन, डिझाईन, मार्केटिंग, जाहिरात आणि डिजिटल सेवा क्षेत्रातील अनेक कामे रखडण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. काही महिन्यांपासून इंधन दरवाढ आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ याचा थेट परिणाम कामगार वर्गावर झाला आहे. रोजच्या प्रवासाचा खर्च वाढल्याने तसेच शहरातील राहणीमान महाग झाल्याने अनेक कामगारांनी आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. कामगारांच्या या स्थलांतरामुळे उद्योग क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता अधिक तीव झाली. विशेषतः लघु व मध्यम उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि सेवा व्यवसायांना याचा मोठा फटका बसला आहे. परिणामी अनेक उद्योजकांना उपलब्ध मनुष्यबळाच्या मर्यादांमध्ये काम करावे लागले किंवा पर्याय म्हणून स्वयंचलित तंत्रज्ञान आणि एआय आधारित साधनांचा वापर वाढवावा लागला.

डिझायनरच्या जागी एआय?

ग््रााफिक डिझाईन, सोशल मीडिया पोस्ट, जाहिरातींची निर्मिती, व्हिडिओ एडिटिंग, बॅनर डिझाईन, लोगो तयार करणे, व्हॉईसओव्हर, फोटो एडिटिंग यांसारख्या अनेक कामांसाठी पूर्वी स्वतंत्र कर्मचारी ठेवावे लागत होते. आज मात्र एआय आधारित सॉफ्टवेअर काही मिनिटांत हे काम करून देत आहेत. आकर्षक डिझाईन, रंगसंगती, पोस्टर, व्हिडिओ आणि डिजिटल कंटेंट तयार करण्यासाठी अनेक व्यावसायिक एआयचा वापर करत आहेत.

छोट्या व्यावसायिकांपर्यंत एआयची एंट्री

फोटो स्टुडिओ, जाहिरात संस्था, डिजिटल मार्केटिंग कंपन्या आणि सोशल मीडिया हाताळणाऱ्या एजन्सींमध्ये एआय प्रीमियम सॉफ्टवेअरचा वापर झपाट्याने वाढत आहे. पूर्वी एका कामासाठी अनेक कर्मचारी लागायचे. आता तेच काम एक किंवा दोन व्यक्ती एआयच्या मदतीने पूर्ण करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढला असून, खर्चातही बचत होत आहे.

कामगारांची जागा नाही, पण कामाचे स्वरूप बदलतेय

तज्ज्ञांच्या मते एआय पूर्णपणे मनुष्यबळाची जागा घेणार नाही. मात्र, पारंपरिक कामांची पद्धत बदलणार आहे. जे कर्मचारी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतील त्यांच्यासाठी संधी वाढतील, तर बदल स्वीकारण्यास तयार नसलेल्यांसमोर आव्हाने निर्माण होऊ शकतात.

उद्योगनगरीतील नवे वास्तव

उद्योगनगरीत आता दोन चित्रे एकाच वेळी दिसत आहेत. एका बाजूला कामगारांच्या शोधात असलेले उद्योजक आहेत. तर, दुसऱ्या बाजूला त्याच समस्येवर उपाय म्हणून एआयचा स्वीकार करणारे व्यावसायिक आहेत. त्यामुळे भविष्यात उद्योग क्षेत्रात जास्त मनुष्यबळ पेक्षा जास्त तंत्रज्ञान हेच यशाचे सूत्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एआयमुळे कोणत्या क्षेत्रांना फायदा?

  • स्थापत्य व अभियांत्रिकी

  • स्टॉक व वेअरहाऊस व्यवस्थापन

  • ई-कॉमर्स

  • ग््रााफिक डिझाईन

  • सोशल मीडिया कंटेंट

  • व्हिडिओ एडिटिंग

  • फोटो स्टुडिओ

  • जाहिरात क्षेत्र

  • डिजिटल मार्केटिंग

  • प्रेझेंटेशन डिझाईन

  • कंटेंट रायटिंग

पूर्वी ग््रााफिक डिझाईन, सोशल मीडिया पोस्ट, जाहिराती, बॅनर, व्हिडिओ एडिटिंग आणि विविध क्रिएटिव्ह कामांसाठी मोठी टीम लागायची. मात्र, सध्या कुशल डिझायनर आणि कर्मचारी मिळवणे कठीण झाले आहे. अशा वेळी एआय आधारित सॉफ्टवेअर आमच्यासाठी मोठा आधार ठरत आहेत. काही मिनिटांत संकल्पना, डिझाईन, कलर कॉम्बिनेशन, बिलिंग, स्टॉक कॅलक्युलेशन, मार्केटींग आणि कंटेंट तयार करता येत असल्याने कामाचा वेग वाढला आहे. अधुनिक तंत्रज्ञानामुळे कर्मचारी पूर्णपणे संपलेले नाहीत; पण एकाच व्यक्तीकडून पूर्वीपेक्षा अनेक पटीने अधिक काम होऊ लागले आहे. त्यामुळे वेळ, खर्च आणि मनुष्यबळ या तिन्ही बाबतीत फायदा होत आहे.
सुधीर शिंदे, उद्योजक
कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ एक तंत्रज्ञान नसून काम करण्याची संपूर्ण पद्धत बदलणारे माध्यम आहे. आज डिझाईन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा विश्लेषण, कंटेंट निर्मिती आणि ग््रााहक सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रांत एआयचा प्रभावी वापर होत आहे. कामगार टंचाई आणि वाढत्या कामाच्या दबावामुळे उद्योगांनी एआयचा स्वीकार केला आहे. एआयमुळे कामाचा वेग वाढतो, पुनरावृत्तीची कामे कमी होतात आणि मानवी चुका टाळण्यास मदत होते. मात्र एआय हे मनुष्यबळाचा पर्याय नसून सहाय्यक साधन आहे. त्यामुळे भविष्यात तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे ही काळाची गरज बनणार आहे.
विजय राठोड, अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT