पिंपरीः दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ड्रायफ्रूटच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काजू, पिस्ता, बदाम आणि खजुराच्या दरांत वाढ झाली असून, दिवाळीच्या फराळासाठी तसेच भेटवस्तू देण्यासाठी ड्रायफ्रूट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
बदामाच्या दरात सुमारे २० टक्के, पिस्त्याच्या दरात २० ते २५ टक्के तर काजूच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांचे दिवाळीचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.
दिवाळीच्या काळात फराळाचे पदार्थ घरी केले जातात किंवा तयार पदार्थ आणले जातात. सध्या ड्रायफ्रूटच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. वाढलेल्या किमतीमुळे नागरिक आवश्यक तेवढेच वस्तूंची खरेदी करताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने महागाईवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाहतूक खर्च, मजुरी, उत्पादनातील घट कारणीभूत
ड्रायफ्रुटच्या दरवाढीमागे वाढलेला वाहतूक खर्च, मजुरीतील वाढ आणि उत्पादनांमध्ये झालेली घट ही प्रमुख कारणे आहेत. बदामाची आवक प्रामुख्याने अमेरिकेतून, पिस्त्याची इराणमधून तर खजुराची सौदी अरेबियातून होते. याच्या वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे शहरातील बदाम, पिस्ता आणि खजुराच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे.
आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये दिवसेंदिवस जागरुकता वाढत आहे. त्यामुळे ड्रायफ्रूडची मागणीही वाढतच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दीड पटीने भाव वाढले आहेत.- रवीकुमार सिंग, दुकानदार