Pimpri Dapodi BRT Route Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Dapodi BRT Route Issue: पिंपरी-दापोडी बीआरटी मार्ग धोक्यात; तुटलेल्या बॅरिकेड्समुळे पीएमपी प्रवास असुरक्षित

बीआरटी मार्गात अनधिकृत वाहनांचा शिरकाव; बसचालकांची कसरत, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: पिंपरी ते दापोडी या बीआरटी मार्गावरील बऱ्याच ठिकाणी बॅरिकेड्स तुटलेले, वाकलेले आणि धोकादायक अवस्थेत असल्याने पीएमपी बसचा प्रवास धोकादायक बनला आहे. तुटलेल्या बॅरिकेड्समधून दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहने अचानक बीआरटी मार्गात घुसत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे बसचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

या मार्गावर पिंपरी, खराळवाडी, एचए, वल्लभनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी या ठिकाणी प्रवास करणारे अनेक प्रवासी दररोज पीएमपी बसने प्रवास करतात. मात्र, अनेक ठिकाणी बॅरिकेड्सची मोडतोड झाल्याने बीआरटीचा मार्ग बाधित झाला आहे. नियमांचे उल्लंघन करून इतर वाहने बीआरटी मार्गात प्रवेश करत असल्याने बसचा वेग कमी करावा लागत असून, वारंवार ब्रेक मारावे लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

प्रवाशांच्या मते तुटलेल्या बॅरिकेड्सची वेळोवेळी दुरुस्ती होत नसल्याने अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर बनते. यापूर्वीही किरकोळ अपघात घडल्याची माहिती प्रवाशांनी दिली असून, मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

प्रवाशांची मागणी

  • तुटलेले सर्व बॅरिकेड्स तातडीने बदलण्यात यावेत.

  • बीआरटी मार्गात अनधिकृत वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी.

  • धोकादायक ठिकाणी अतिरिक्त सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही व्यवस्था करावी.

  • बीआरटी मार्गाची नियमित पाहणी करून आवश्यक दुरुस्ती तत्काळ करावी.

तुटलेल्या बॅरिकेड्समुळे इतर वाहने अचानक बीआरटी मार्गात येण्याची भीती असते. त्यामुळे बसचा वेग कमी करावा लागतो आणि अपघात टाळण्यासाठी सतत सतर्क राहवे लागते. प्रशासनाने बॅरिकेड्सची त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
पीएमपी बसचालक.
बीआरटी मार्ग सुरक्षित प्रवासासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र, तुटलेल्या बॅरिकेड्समुळे त्याचा उद्देशच निकामी ठरत आहे. मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.
अलीभाई कुरेशी, प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT