संतोष शिंदे
पिंपरी: फुगेवाडी येथील विषारी दारूकांडानंतर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हातभट्टी व गावठी दारूच्या अड्ड्यांवर धडक कारवाया सुरू केल्या आहेत. शहर आणि परिसरातील अनेक हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून, या कारवाईचा परिणाम दिसू लागला आहे. हातभट्टीची दारू सहज उपलब्ध होत नसल्याने अनेक मद्यपी आता परवानाधारक देशी दारूकडे वळत असल्याचे चित्र आहे. शहरातील विविध देशी दारू विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार मागील काही दिवसांत विक्रीत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असली तरी देशी दारु शरीरास हानीकारकच आहे.
फुगेवाडीतील विषारी दारूकांडात अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. पोलिस आयुक्तालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे विविध भागांत छापे टाकत हातभट्टीच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर रसायने, कच्चा माल आणि तयार मद्य जप्त करण्यात आला आहे. यामध्ये अनेक जणांना अटकही करण्यात आली आहे. परिणामी, शहरातील अवैध मद्यपुरवठा साखळीला मोठा फटका बसला आहे.
देशी दारू कशी बनते?
देशी दारूची निर्मिती परवानाधारक कारखान्यांमध्ये निश्चित मानकांनुसार केली जाते. ऊस मळी (मोलॅसेस) किंवा इतर मान्य कच्च्या मालापासून प्रथम अल्कोहोल तयार केले जाते. त्यानंतर त्याचे शुद्धीकरण करून आवश्यक प्रमाणात पाणी मिसळले जाते. उत्पादनाची गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासली जाते. विविध टप्प्यांवर उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रण असते. त्यानंतर बाटलीबंद करून अधिकृत विक्री केंद्रांमार्फत विक्री केली जाते. संपूर्ण प्रक्रिया नियमबद्ध आणि नोंदणीकृत असते.
हातभट्टी कशी बनते?
हातभट्टीची दारू बहुतांश वेळा दुर्गम भागातील झोपड्या, मोकळी मैदाने किंवा शेत परिसरात बेकायदेशीररित्या तयार केली जाते. गूळ, नवसागर, साखर, रसायने आणि विविध पदार्थांचे मिश्रण मोठ्या ड्रममध्ये साठवून आंबवले जाते. त्यानंतर भट्टीच्या साहाय्याने त्याचे ऊर्ध्वपातन करून मद्य तयार केले जाते. या प्रक्रियेत कोणतेही वैज्ञानिक नियंत्रण नसते. अनेकदा नफा वाढविण्यासाठी घातक रसायने मिसळली जातात. त्यामुळे तयार होणारी दारू धोकादायक असते.
हातभट्टीमुळे महसुलाला फटका
अवैध हातभट्टी आणि गावठी दारूच्या व्यवसायामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसतो. परवानाधारक मद्यविक्रीवर उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर आणि विविध प्रकारचे कर आकारले जातात. मात्र, हातभट्टीची दारू बेकायदेशीररित्या तयार व विकली जात असल्याने शासनाला कोणताही महसूल मिळत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा कर बुडतो. याच पैशातून शासन विविध विकासकामे, आरोग्य आणि पायाभूत सुविधा उभारते. त्यामुळे अवैध मद्यव्यवसाय हा केवळ कायद्याचाच नव्हे, तर अर्थव्यवस्थेचाही प्रश्न मानला जातो.
विषबाधा होण्याचा धोका कमी
परवानाधारक देशी दारू उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांनुसार आणि गुणवत्ता तपासणीनंतर विक्रीसाठी उपलब्ध केली जाते. उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या घटकांवर नियंत्रण असल्याने विषारी रसायने मिसळली जाण्याची शक्यता अत्यल्प असते. याउलट हातभट्टीच्या दारूमध्ये नफा वाढविण्यासाठी मिथेनॉलसारखी घातक रसायने मिसळली जातात. त्यामुळे अंधत्व, अवयव निकामी होणे किंवा मृत्यूचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे हातभट्टीच्या तुलनेत परवानाधारक देशी दारूमध्ये विषबाधेचा धोका तुलनेने कमी मानला जातो.
देशी दारूच्या दुकानात रात्री उशिरापर्यंत गर्दी
यापूर्वी कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या हातभट्टीच्या दारूला काही भागांत मोठी मागणी होती. रोजंदारी कामगार, बांधकाम मजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील काही ग्राहक कमी खर्चामुळे हातभट्टीच्या दारूला प्राधान्य देत होते. मात्र, दारूकांडानंतर निर्माण झालेली भीती, अवैध अड्ड्यांवरील कारवाया आणि हातभट्टीची कमी झालेली उपलब्धता यामुळे अनेक ग्राहक परवानाधारक देशी दारूकडे वळल्याचे दिसून येत आहे. अनेक देशी दारू विक्रेत्यांनी ग्राहक संख्येत वाढ झाल्याचे सांगितले आहे. रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची वर्दळ कायम राहत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. हातभट्टीच्या ग्राहकांचा ओढा वाढल्याने देशी दारू विक्रेत्यांनाही त्याचा आर्थिक फायदा होत आहे.
शहर परिसरातील विविध परवानाधारक विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांची वर्दळ तसेच, देशी दारूच्या मागणीत वाढ झाली आहे. अवैध हातभट्टीच्या अड्ड्यांवर झालेल्या कारवायामुळे ग्राहक परवानाधारक मद्याकडे वळल्याचे दिसून येत आहे. विक्रीतील वाढीची अचूक टक्केवारी मासिक विक्री अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चित करता येईल.अतुल कानडे, पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे
फुगेवाडी दारूकांडानंतर आमच्या दुकानातील देशी दारूची विक्री सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वी हातभट्टीचे सेवन करणारे अनेक ग्राहक आता आमच्याकडे येत आहेत. मागणी इतकी वाढली आहे की, सकाळी दुकान उघडल्यापासून ते रात्री बंद होईपर्यंत ग्राहकांची सतत वर्दळ असते. रात्री उशिरापर्यंत ग्राहक येत असतात.परवानाधारक देशी दारू विक्रेता, चिंचवड