Water  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Water Supply Disruption: पिंपरी-चिंचवडमध्ये तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प; निगडी, रावेत, आकुर्डीत नागरिक संतप्त

देखभाल कामांनंतरही पुरवठा सुरळीत नाही; टँकरवर अवलंबून रहिवासी, आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांमध्ये मागील तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन कोलमडले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सोमवार (दि. 23) सेक्टर क्रमांक 23 येथे स्थापत्य व विद्युतविषयक तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. या कामांमुळे निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले होते; मात्र बुधवारीदेखील आकुर्डी, वाल्हेकरवाडी, रावेत, निगडी-प्राधिकरण या भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देखभाल-दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात तीन दिवस उलटूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत कामे सुरू होती. त्यामुळे पाणीपुरवठा उशिराने सोडण्यात आला. तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास विलंब झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाणी ही मूलभूत गरज असल्याने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार पाणीपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांमुळे नाराजी वाढत असून, प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

संत तुकारामनगरमध्येही तीच परिस्थिती

संत तुकारामनगर, पिंपरी परिसरात मागील महिन्याभरापासून पाणीपुरवठा अनियमित व विस्कळीत स्वरूपात होत आहे. त्यामुळे रहिवासी वैतागले आहेत. या भागात पूर्वी एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा होत होता. सध्या 2 ते 3 दिवसानंतर पाणी येत आहे. ते ही कमी दाबाने आणि अनियमित आहे. या भागांत रहिवाशी क्षेत्रासह शैक्षणिक संस्था, रुग्णालय व हॉटेल मोठ्या संख्येने आहेत.

पाणी कमी येत असल्याने ते दिवसभर पुरत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात तक्रारी करूनही, महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग संबंधित बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. तक्रारींची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष म्हात्रे यांनी केली आहे.

निगडी-प्राधिकरणात बुधवारपर्यंत पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे तीन दिवस पाण्यावाचून काढणे शक्य नव्हते. पैसे खर्च करून पाण्याचे टँकर बोलावले; परंतु टँकरचे पाणी सर्वांना पुरणे मुश्किल आहे. महापालिकेने किमान पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी.
शैलश शिंदे, निगडी-प्राधिकरण, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT