Water Crisis Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Water Crisis: पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी संकट तीव्र; १५ टक्के पाणीकपातीचा थेट फटका

पवना धरणातील साठा घटल्याने रावेत बंधाऱ्यातून पाणी उचल कमी; नागरिकांना काटकसरीचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पवना धरणातील पाणीसाठ्यात झालेली घट आणि मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी पुन्हा मंगळवार (दि. २३) केले आहे.

शहरातील उपलब्ध जलस्रोतांवर वाढता ताण लक्षात घेऊन महापालिकेकडून पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याचा वापर करून जलतरण तलाव भरण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहन धुण्यासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

पाणी बचतीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच घरगुती पातळीवर पाण्याची गळती रोखणे, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. हाऊसिंग सोसायट्या व नागरिकांनी पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवणुकीवर भर द्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.

चार दिवस उलटूनही एकाही व्यक्तीवर कारवाई नाही

पाटबंधारे विभागाने शुक्रवार (दि. १९) पासून १५ टक्के पाणीकपात सुरू केली आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवार (दि. २०) पासून शहरात 15 टक्के पाणीकपात सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठ्यात अर्धा ते एक तास कमी करण्यात आले आहे. त्यावेळेस आयुक्तांनी पिण्याच्या पाण्याची नासाडी करण्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, तो निर्णय जाहीर करून चार दिवस उलटले तरी, अद्याप एकाही व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई करण्यासाठी अद्याप पथकेच नेमण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

निगडी, प्राधिकरणातील २४ तास पाणीपुरवठा बंद

प्राधिकरण, निगडी परिसरात अनेक वर्षापासून २४ तास पाणीपुरवठा करण्यात येत होता. शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई असताना केवळ त्या भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होता. तसेच, हा प्रकार शहरवासीयांसाठी समन्यायिक नसल्याने त्या भागाचा 24 तास पाणीपुरवठा नुकताच बंद करण्यात आला आहे. तेथे दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.

रावेत बंधार्‍यातून केवळ ५५५ एमएलडीऐवजी ४७५ एमएलडी पाणी

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवार (दि. २०) पासून पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पवना धरणातून पाणी सोडण्यात कपात सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी महापालिकेकडून पवना नदीवरील रावेत बंधारा येथून दररोज ५५५ एमएलडी पाणी उचलले जात होते. पाणी कपात सुरू झाल्यापासून आता महापालिकेस केवळ ४७५ एमएलडी पाणी मिळत आहे. त्या पाण्यावर निगडी, प्राधिकरण सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते पाणी शहराला पुरवले जात आहे. तर, आंद्रा धरणातून निघोजेच्या इंद्रायणी नदी बंधार्‍यातून १०० एमएलडीऐवजी ८५ एमएलडी पाणी उचलले जात आहे. त्या पाण्यावर चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून त्या परिसरात पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT