Stray Dog Pudhari
पिंपरी चिंचवड

Stray Dog Menace: पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या श्वानांची दहशत; २७ हजारांहून अधिक श्वानदंश प्रकरणे

लसींची कमतरता, नसबंदी असूनही संख्या नियंत्रणाबाहेर; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: सध्या शहरामध्ये भटक्या श्वानांनी चावा घेण्याबरोबरच नागरिकांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे भटक्या श्वानांची दहशत वाढत असून, त्यांच्या संख्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 2025 ते जानेवारी 2026 आत्तापर्यंत 27 हजार 455 व्यक्तींना श्वानांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.

श्वानांना महापालिकेचे कर्मचारी पकडून नेतात. त्यांच्यावर नसबंदी करून पुन्हा त्याच परिसरात सोडतात, तरीदेखील भटक्या श्वानांची संख्या कमी झालेली दिसून येत नाही. शहरामध्ये या भटक्या श्वानांना खायला देऊन भूतदया दाखविणारे नागरिकही आहेत. रस्त्यावरील कचराकुंड्यांमध्ये फेकण्यात येणाऱ्या अन्नाचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. कचऱ्यांच्या ढिगामध्ये भटक्या श्वानांना अन्नपदार्थ सहजपणे मिळतात. त्यामुळे त्या भागात श्वानांची संख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे.

रस्त्याने जाताना विशेषत: रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी श्वानांच्या झुंडीने अंगावर धावून येणाऱ्या घटना शहरात घडत आहेत. शहरात दर महिन्याला जवळपास हजारांहून अधिक श्वानांनी चावा घेतल्या व्यक्ती रुग्णालयात येतात. भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणले नाही तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्राणिप्रेमी संस्थांनी भटक्या श्वानांना न मारता त्यांची नसबंदी करण्याचा तोडगा काढला आहे. एका श्वानांवर 999 रुपये इतका शस्त्रकियेचा खर्च येतो. यासाठी महापालिकेने मागे 2 कोटी रुपयांची तरतूद केली होती. सध्या पालिका स्वत: निर्बीजीकरणावर खर्च करत आहे.

लसीची कमतरता

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार महिन्याकाठी जवळपास 1 हजार व्यक्तींना श्वानदंश होतो. तर, महापालिकेकडे दिवसाकाठी फक्त 713 लस उपलब्ध असते. मनपा रुग्णालयामध्ये ही लस मोफत दिली जाते. त्यामुळे इतर व्यक्तींना मात्र खासगी रुग्णालयात लसीसाठी धावाधाव करावी लागते.

कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिकेने चार सर्जन आणि कर्मचारी नेमले आहेत. कुत्रे पकडण्यासाठी चार वाहने आहेत. पाच दिवस कुत्र्यांना देखभालीसाठी ठेवण्यात येते. गेल्या दोन वर्षांमध्ये निर्बीजीकरणाचा खर्च सीएसआर फंडातून करण्यात आला आहे. आता दोन महिन्यांपासून महापालिका खर्च करत आहे.
डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT