खराळवाडी: पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त सुरक्षारक्षकांना आजही किमान वेतनापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे वाढत्या महागाईमुळे त्यांचे जगणे अधिकच कठीण झाले आहे. दिवसाला आठ तास ड्युटी करुन इतर छोटे-मोठे कामे सांभाळूनही पुरेसे वेतन मिळत नसल्याची खंत सुरक्षारक्षकांनी व्यक्त केली आहे.
सुट्यांचा अभाव
समान कामाला समान वेतन या तत्त्वानुसार कामाचे मूल्य ठरले गेले, तर आम्हालाही सन्मानाने जीवन जगता येईल, अशी भावना अनेक सुरक्षारक्षकांनी व्यक्त केली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ शहरात सुमारे ५००० हजारांहून अधिक आस्थापनांमध्ये सुरक्षारक्षक आपले कर्तव्य निभावत असून, तेथे मात्र त्यांना योग्य वेतन, सुट्या किंवा कामाच्या तासांची हमी मिळत नाही. कामामध्ये शोषण होत असल्याचा आरोप विविध सुरक्षारक्षक संघटनेने केला आहे. नोंदणीकृत सुरक्षारक्षकांसाठी किमान वेतन निश्चित करण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, प्रभावी निर्णयाची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही.
महिन्याचे बजेट कोलमडले
परिणामी अनेक सुरक्षारक्षकांना महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपयांवर काम करावे लागत आहे. पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळालाही भरघोष निधी मिळालेला नसल्याने सुरक्षारक्षकांच्या विविध कल्याणकारी योजना रखडल्या आहेत. रोजगार करार नसणे, अपूर्ण नोंदणी प्रक्रिया आणि कायदेशीर स्वसंरक्षणाचा अभाव यामुळे सुरक्षारक्षकांना अन्याय सहन करावा लागत आहे.
सुरक्षारक्षक संघटनांनी शासनाकडे नियमित नोंदणी वेतन, श्रेणी विमा योजना आणि सामाजिक सुरक्षा योजना तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. कामाच्या स्वरूपानुसार वेतनात मोठी तफावत असल्याचेही समोर आले आहे. तुटपुंजे वेतन असूनही ते वेळेवर मिळत नसल्याने महिन्याचे बजेट कोलमडले जाते. वाढती महागाई आणि अनिश्चित रोजगार यामुळे नोंदणीकृत सुरक्षारक्षकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने किमान वेतनात वाढ करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी सुरक्षारक्षकांकडून केली जात आहे.
सुरक्षारक्षकांना कर्ज देण्यास टाळाटाळ
मंडळात काम करून दहा वर्षे झाले तरी सुरक्षारक्षकांना एकच लाख रुपये कर्ज दिले जात आहे. घर दुरुस्ती, मुलांचे शिक्षण, लग्न, घरातील व्यक्तींचे आजारपण यासाठी मिळणाऱ्र्या कर्जाची रक्कम फार कमी आहे. त्यात ते वेळेवर मिळत नाही. कर्जाच्या रकमेत दुप्पट वाढ करून सुरक्षारक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी सुरक्षारक्षकांनी केली आहे.