पिंपरी: खासगी वाहनांवर परवानगीशिवाय पोलिस असा मजकूर, चिन्ह, स्टीकर लावणे कायद्याने गुन्हा जरी असला तरी, पिंपरी चिंचवड शहरात काही वाहनचालक असा मजकूर वापरत असल्याचे निर्देशनास येत आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लघंन होत आहे. वाढते प्रकार निर्देशनास येताच वाहतूक पोलिसांनी या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात पोलिस नाव किंवा लोगाेचा वापर केलेल्या २३ वाहनचालकांवर कारवाई करत ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
अनेक खासगी वाहनचालक आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर पोलिस असे स्टीकर लावतात. नियमांनुसार पोलिस विभागाचे अधिकृत बोधचिन्ह, चिन्हे किंवा पोलिस हा शब्द केवळ अधिकृत पोलिस वाहने किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी असलेल्या वाहनांनाच वापरण्याची परवानगी आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक खासगी वाहनचालक पोलिस विभागाशी संबंधित बोधचिन्हे लावून शहरात सर्रापणे वाहने चालवत असल्याचे दिसत आहे. मात्र अशा वाहनांचा गुन्हात गैरवापर होण्याची शक्यता नकारता येत नाही. या वाहनांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
काय सागंतो कायदा..
कायदा १९५० नुसार, पोलिस बोधचिन्हाचा वापर कोणत्याही व्यापारी, व्यावसायिक किंवा जाहिरातीच्या उद्देशाने करता येत नाही. खासगी वाहनांवर नामफलक, स्टीकर, व चिन्हे लावली असल्यास त्या वाहनांवर मोटार वाहन आधिनियम १९८८ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार परिवहन विभागात वाहतूक पोलिसांचे आहे.
पोलिस असल्याचा धाक..
अशा वाहनांचा अवैध कामांसाठी तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वापर होत आहे. तसेच, पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी असलेल्या व्यक्तीच्या मुलांच्या, नातेवाइकांच्या वाहनांवरही असे लोगाे आणि नाव लावल्याचे प्रकार आढळतात. पोलिस नावाचा धाक दाखवून प्रवासी वाहनांचा वापर होत असल्याचा तक्रारी आहेत. नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि वाहन तपासणीदरम्यान अशा वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे असे प्रकार वाढत आहे.
पोलिसांचे बोधचिन्ह, खासगी वाहनावर लावण्याची परवानगी नाही. नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात २३ वाहनचालकांवर कारवाई करत ११ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवड