‘ट्रॅफिक बडी’त घुसखोरी करणार्‍या 163 भामट्यांना ‘ब्रेक’ Pudhari
पिंपरी चिंचवड

Traffic Buddy Scam: ‘ट्रॅफिक बडी’त घुसखोरी करणार्‍या 163 भामट्यांना ‘ब्रेक’

गुन्हेगारी पार्श्वभूमी, अवैध धंद्यांतील सहभाग उघड; पोलिसांची काटेकोर छाननी

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या ‘ट्रॅफिक बडी’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या माध्यमातून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा काही भामट्यांनी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी काढलेली गोपनीय माहिती आणि पारदर्शक छाननी प्रक्रियेमुळे 163 संशयास्पद अर्जदारांचा सहभाग थांबविण्यात आला आहे. अर्जदारांपैकी अनेक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, काही जण सट्टा, मटका, तस्करी, गांजाविक्री यांसारख्या अवैध व्यवहारात सक्रिय असल्याची माहिती उघड झाली आहे.  (Latest Pimpri News)

‘ट्रॅफिक बडी’ म्हणजे काय?

हा उपक्रम व्हॉट्सअ‍ॅपवर आधारित असून, 8788649885 या क्रमांकावर तक्रारी, अडथळे, सूचना आणि स्वयंसेवक म्हणून नोंदणी करता येते. ‘एमआयटी’ आळंदीच्या तांत्रिक सहकार्याने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जीपीएस लोकेशन आणि फोटोसह माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहचते आणि नागरिकांना कार्यवाहीबाबत प्रतिसाद दिला जातो.

268 ट्रॅफिक बडी मैदानात

काटेकोर छाननीनंतर 268 अर्जदारांची निवड करण्यात आली आहे. हे ट्रॅफिक बडी (स्वयंसेवक) शहरात वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी सक्रिय होणार आहेत. अपघातस्थळी मदत, अडथळ्यांची माहिती, अवैध पार्किंगवर नियंत्रण आणि वाहतूक कोंडीत मदत अशी विविध कामे हे स्वयंसेवक पार पडणार आहेत.

540 अर्ज; 163 अर्ज फेटाळले

या उपक्रमासाठी 540 नागरिकांनी अर्ज सादर केले होते. प्रत्येक अर्जाची बारकाईने छाननी करताना गुन्हेगारी इतिहास, व्यवसाय, पोलिस ठाण्यातील नोंदी, मोबाईल नंबर आणि ओळखींची खातरजमा करण्यात आली. या तपासात 163 अर्जदार संशयास्पद आढळले. काहींनी खोट्या नावाने अर्ज केल्याचेही निष्पन्न झाले. काही जणांनी वाहतूक नियमनाच्या नावाखाली वैयक्तिक आकस काढण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांना आढळले.

गोपनीय यंत्रणांचा आधार

‘ट्रॅफिक बडी’मध्ये सहभागी होण्यासाठी मंजुरी देण्यापूर्वी पोलिसांकडून गोपनीय यंत्रणांच्या मदतीने अर्जदारांचे बायोडेटा पडताळले गेले. पार्श्वभूमी तपासताना पोलिसांनी कोणतीही तडजोड केली नाही. हा उपक्रम शिस्तबद्ध नागरिकांच्या सहभागावर आधारित असल्याने त्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्थान नाकारले जाणे आवश्यक होते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

109 अर्ज प्रलंबित

सध्या 109 अर्जांची छाननी प्रक्रियेत असून, संशयास्पद माहिती मिळाल्यास ते अर्जही फेटाळण्यात येणार आहेत. पोलिसांकडून या प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्तीवर भर देण्यात येत आहे.

वाहतूक सुधारण्यासाठी नागरिकांचा थेट सहभाग ही काळाची गरज आहे. मात्र, या सेवेद्वारे स्वतःचा स्वार्थ साधणार्‍यांना थारा दिला जाणार नाही. आमच्या तपासणी प्रक्रियेमुळे 163 जणांना वेळीच थांबवता आले. ‘ट्रॅफिक बडी’ ही नागरिक-प्रशासन यांच्यातील विश्वास वाढवणारी शिस्तीची सेवा आहे.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.
‘ट्रॅफिक बडी’ उपक्रम केवळ वाहतूक सुधारण्यासाठी नसून, जबाबदार नागरी सहभागाची चळवळ आहे. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा सहभाग टाळल्यासच ही चळवळ यशस्वी होईल. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दाखवलेली दक्षता अन्य शहरांसाठी आदर्श ठरू शकते.
- सुदेश राजे, संस्थापक सदस्य, पिंपरी-चिंचवड हौसिंग फेडरेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT