Passport Verification Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Passport Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये 520 पासपोर्ट अर्ज बाद; गुन्हेगारांचे परदेश स्वप्न फोल

पोलिस पडताळणीत गुन्हे उघड; ‘डबल चेक’ यंत्रणेने अर्जदारांवर कडक नजर

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: परदेशात पळ काढण्याच्या किंवा पर्यटनाच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तब्बल 520 जणांचे मनसुबे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पडताळणी विभागाने उधळून लावले आहेत. पासपोर्टच्या माध्यमातून देशाबाहेर जाण्याचे स्वप्न रंगवणाऱ्यांना पोलिसांनी कागदावरच रोखत थेट अर्ज बाद केले. त्यामुळे ‌‘परदेशवारी‌’चे स्वप्न पाहणाऱ्या गुन्हेगारांना जोर का झटका बसला असल्याचे चित्र आहे.

उद्योगनगरी अशी ओळख असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातून शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच पासपोर्ट अर्जांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मागील वर्षभरात 2025 मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडे तब्बल 1,01,556 अर्ज पडताळणीसाठी आले. त्यापैकी 1,01,036 अर्ज मंजूर झाले; मात्र पोलिस तपासात गुन्हे उघडकीस आल्याने 520 अर्ज थेट बाद करण्यात आले आहेत. म्हणजेच, प्रत्येक हजार अर्जांमागे काही गुन्हेगार पासपोर्ट मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, त्यांना मपोलिस पडताळणीफ हा अडथळा ठरत आहे.

कशी होते पडताळणी?

पासपोर्ट प्रक्रियेत पोलिस पडताळणी हा केवळ औपचारिक टप्पा नसून तो ‌‘फिल्टर‌’ म्हणून काम करतो. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याकडे येते. तेथे पोलिसांकडून अर्जदाराचा पत्ता, ओळख, कागदपत्रांची सत्यता तपासली जाते. यासोबतच संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल आहेत का, गुन्ह्यांचे स्वरूप काय आहे, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे का, याची सखोल चौकशी केली जाते. गुन्हे आढळल्यास त्याची नोंद थेट पासपोर्ट विभागाला पाठवली जाते आणि त्यावर अंतिम निर्णय घेतला जातो.

पडताळणी विभागाचा ‌‘वॉच‌’

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्यात यासाठी स्वतंत्र पडताळणी विभाग कार्यरत आहे. स्थानिक पातळीवर माहिती गोळा करून ती आयुक्तालयातील पडताळणी शाखेकडे पाठवली जाते. येथे दुसऱ्या टप्प्यात पुन्हा छाननी होते. या मडबल चेकफ प्रणालीमुळे कोणतीही त्रुटी राहू नये, याची काळजी घेतली जाते. त्यामुळेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना परदेशवारीच्या उंबरठ्यावरच अडवले जाते.

नावसाधर्म्याचा फटका

काही प्रकरणांमध्ये नाव साधर्म्यामुळेही पडताळणीत अडथळे येतात. समान नाव असलेल्या व्यक्तींमुळे संशय निर्माण होतो आणि अधिक तपास करावा लागतो. मात्र, अशा प्रत्येक प्रकरणात सखोल पडताळणी करूनच अंतिम अहवाल दिला जातो.

10 दिवसांत पडताळणी पूर्ण

पोलिस पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे. पासपोर्ट कार्यालयाकडून आलेल्या अर्जांवर 21 दिवसांत कार्यवाही अपेक्षित असते. त्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्याकडून सुमारे 10 दिवसांत प्राथमिक पडताळणी पूर्ण केली जाते, तर आयुक्तालय स्तरावर अंतिम अहवाल साधारण 15 दिवसांत पाठविला जातो. वाढत्या अर्जांच्या पार्श्वभूमीवरही ही प्रक्रिया जलदगतीने राबवली जात असल्याचा दावा केला जात आहे.

कोविडनंतर अर्ज वाढले

कोविडनंतर आंतरराष्ट्रीय प्रवास सुरळीत झाल्याने पासपोर्ट अर्जांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 2019 मध्ये 67,530 अर्ज होते, तर 2025 मध्ये हा आकडा थेट 1 लाखांच्या पुढे गेला आहे. अर्जांची वाढती संख्या आणि त्यामधील गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड होणारी प्रकरणे यामुळे पोलिसांच्या पडताळणी विभागाची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरत आहे. परदेशवारीचे स्वप्न पाहणे सोपे असले, तरी पोलिस पडताळणीच्या कसोटीत ते स्वप्न टिकवणे आवश्यक आहे. हे या आकडेवारीतून स्पष्ट होते. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्यांसाठी हा विभाग मबेकफ ठरत असून, स्वच्छ पार्श्वभूमी असलेल्यांनाच परदेशाचा मार्ग खुला होत आहे.

अर्जदारावर गुन्हे दाखल आहेत किंवा नाही, याची सखोल तपासणी केली जाते. गुन्हे आढळल्यास तात्काळ पासपोर्ट विभागाला माहिती दिली जाते. कोणतीही ढिलाई न ठेवता पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर आमचा भर आहे.
संजय नरवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पडताळणी विभाग, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT