Murder Pimpri Chinchwad Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Crime News: 1.94 कोटींची ऑनलाईन फसवणूक, खून, देशी पिस्तूल व वाहनचोरी उघड

टेलिग्राम ट्रेडिंग व टास्क स्कॅम, सोमाटणे फाट्यात निर्घृण खून; 13 दुचाकींसह चोरट्यांची जोडगोळी जेरबंद

Sakshi Kadam

पिंपरी: टेलिग्राम व ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल 1 कोटी 94 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत चिखली परिसरात घडली. बेटेज ट्रेडिंग ग्रुपचा एरिया मॅनेजर असल्याचे सांगणारा आदित्य ठाकूर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गोविंद विश्वनाथ मुळे (40, रा. चिखली, पुणे) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून त्यांनी गुरुवारी (दि. 5) याबाबत चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने टेलिग्रामद्वारे फिर्यादी गोविंद यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर टेलिग्रामवर लिंक पाठवून ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेल असे सांगितले. त्यानंतर गोविंद यांच्याकडून वेगवेगळ्या यूपीआय पेमेंटद्वारे रक्कम उकळून त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. काही काळानंतर फिर्यादीचा ट्रेडिंग आयडी ब्लॉक करून एकूण एक कोटी 94 लाख 14 हजार पाच रुपये ऑनलाईन पद्धतीने लुबाडण्यात आले. चिखली पोलिस तपास करीत आहे.

टास्कच्या बहाण्याने महिलेची आठ लाखांची फसवणूक

ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे सात लाख 92 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना 6 ते 8 जानेवारी या कालावधीत तळेगाव दाभाडे परिसरात घडली आहे. याप्रकरणात शिवम सिंग, अभिषेक राजोरिया तसेच दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने याबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. आरोपींनी टेलिग्रामवर विविध टास्कच्या लिंक पाठवून पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने टास्क पूर्ण करण्याच्या नादात वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सात लाख 92 हजार रुपये पाठवले. त्यानंतर आरोपींनी संपर्क बंद केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहे.

देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई 4 फेब्रुवारी रोजी आंबेठाण येथे करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी विकी दीपक चव्हाण (20, रा. सोनबळ वस्ती, आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे; मुळ रा. धानोरा भुसे, जि. वाशिम) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलिस शिपाई शेखर खराडे यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे 50 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व एक हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले. आरोपी विकी चव्हाण विरोधात भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहे.

आईवरून शिवीगाळ केल्याने ‌‘त्या‌’ तरुणाचा खून

दगडाने ठेचून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना सोमाटणे फाटा येथे गुरुवारी (दि. 5) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. दरम्यान, आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाने हा खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आकाश बालाजी शिंदे (वय 27, नोकरी, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सनी प्रमोद चव्हाण (24, शिरगाव-गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक केली आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटली नाही.

एका अनोळखी तरुणाने आरोपी सनी चव्हाण याला आईवरून शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने आरोपीने दगडाने ठेचून अनोळखी तरुणाचा खून केला. घटनास्थळी दारूचे साहित्य आढळल्याने हा प्रकार दारू पिताना झालेला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहे.

वाहनचोरी करणारी जोडगोळी जेरबंद ; 13 दुचाकी जप्त

सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात वाहनचोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख 50 हजार रुपये किमतीच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. निलेश राजू मंडलिक (24, रा. आंबेठाण चौक, चाकण. मूळ रा. कर्जत, अहिल्यानगर), संदीप साहेबराव सोनवणे (25, रा. कर्जत, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. निलेश मंडलिक याला सुरुवातीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार संदीप याच्या सोबत मिळून वाहनचोरी केल्याचे सांगितले. दोघांकडून पाच लाख 50 हजार रुपये किमतीच्या 13 दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे उत्तर महाळुंगे एमआयडीसी, चाकण, चतुःशृंगी, करमाळा पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक आणि दक्षिण महाळुंगे एमआयडीसी, शिक्रापूर पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. इतर पाच दुचाकींच्या मालकांचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT