पिंपरी: ऑक्टोबर हिटचा तडाखा पिंपरी-चिंचवडकरांना बसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, बुधवारी शहराचे कमाल तापमान ३४.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सकाळपासूनच कडक ऊन आणि दमट हवामानामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून परतीच्या प्रवासावर असला तरी आर्द्रता अजूनही 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तापमान ३४ अंश असले तरी प्रत्यक्षात ३८ ते ३९ अंशापेक्षा जास्त गरम जाणवत आहे.
वाकड, हिंजवडी, भोसरी, निगडी या आयटी आणि औद्योगिक पट्ट्यात उन्हाचा सर्वाधिक फटका बसत आहे. दुचाकीस्वार, बांधकाम कामगार आणि शाळेतील मुलांना या उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुढील ३ ते ४ दिवस शहरात अशीच स्थिती राहणार आहे.