Pimpri-Chinchwad new municipal building construction
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील डीमार्ट शेजारी नवीन महापालिका भवनाचे बांधकाम तिसर्या मजल्यापर्यंत झाले आहे. आत्तापर्यंत 62 टक्के काम पूर्ण झाले आहे. जानेवारी 2026 पर्यंत इमारतीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.
सायन्स पार्क शेजारील 8.65 एकर जागेत ही इमारत उभी राहणार आहे. त्यात एकूण 91 हजार 459 चौरस मीटर बांधकाम केले जाणार आहे. प्रकल्पासाठी सुमारे 312 कोटी 20 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बांधकामास जानेवारी 2023ला सुरूवात झाली आहे. तळमजल्यासह आत्तापर्यंत तिसर्या मजल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. प्रकल्पात 18 मजली चार इमारती उभारण्यात येणार आहेत. (Latest Pimpri News)
या नव्या पर्यावरणपूरक इमारतीमुळे महापालिकेचे सर्वच विभाग एका छत्राखाली येणार आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना सर्व विभागांच्या सेवा व सुविधा या नव्या महापालिका भवनात उपलब्ध होणार आहेत या नव्या इमारतीमध्ये सभागृह, मिटींग हॉल, नागरी सेवा केंद्र, बहुउद्देशीय हॉल, संग्रहालय, प्रदर्शन हॉल, ई-गव्हर्नन्स सेंटर, ग्रंथालय, वाचनालय, क्लिनिक, वाहनतळ, उद्यान, स्वच्छतागृह आदी सुविधा असणार आहेत, असे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.