पिंपरी : राज्य शासनाच्या 'माझी वसुंधरा' अभियानात पिंपरी चिंचवड महापालिकेने १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहराच्या गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महापालिकेस आठ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
हे अभियान १ एप्रिल २०२३ ते दिनांक ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले होते. या अभियानात राज्यातील ४१४ स्थानिक स्वराज्य संस्था आणि २२ हजार २१८ ग्रामपंचायत अशा एकूण २२ हजार ६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.
या अभियानाचा निकाल शुक्रवारी (दि.२७) जाहीर करण्यात आला आहे. दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राज्यस्तरीय अमृत गटात पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
नवी मुंबई महापालिकेने दुसरा तर, ठाणे महापालिकेने तिसरा क्रमांक मिळविला आहे. बक्षीसांची रक्कम शहराचे हरित अच्छादन वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेसाठी करायचे आहे.
मियावाकी वृक्षारोपण, अमृत वन, स्मृती वने, शहरी वने, सार्वजनिक उद्याने, जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल, रोप वाटीकांची निर्मिती, जलसंवर्धनाचे उपक्रम, रेन वॉटर हारवेस्टिंग व परकोलेशन, नदी, तळे व नाले यांचे पुनःजिविकरण,
नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या उपाययोजना, सौरउर्जेवर चालणारे/एलईडी चालणारे दिवे, विद्युत वाहनांना प्रोत्साहन, चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे,
माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धाच्या विजेत्यांना बक्षीस देणे आदींसाठी बक्षीस रक्कम वापरण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.