Mother Nutrition Scheme Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Mother Nutrition Scheme: पिंपरी-चिंचवडमध्ये मातांना पौष्टिक खाऊ, नवजात मुलींना बाळंतविडा; तीन वर्षांत ७५ कोटींचा खर्च

३६ हजार मातांना पौष्टिक आहार, १७ हजार बालिकांना साहित्य वाटपाची योजना; शासनाची योजना असतानाही नव्या निविदेवरून खर्चाबाबत प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: प्रशासकीय राजवटीत महापालिका कर्जबाजारी झाल्यामुळे सध्या प्रभागातील कामांसाठी निधी नाही, असे सांगितले जात आहे. असे असताना समाज विकास विभागाने शहरातील ३६ हजार मातांना पौष्टिक खाऊ व १७ हजार नवजात मुलींना बाळंतविडा देण्याची नवीन योजना आणली आहे. राज्य शासनाची अशीच योजना असताना पुन्हा एका वर्षासाठी २५ कोटी असे तीन वर्षांसाठी तब्बल ७५ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. शासनामार्फत सर्वत्र डीबीटीचे (थेट लाभ बँकेत हस्तांतरण) धोरण राबवत असताना ठेकेदार पोसण्यासाठी असा खर्चिक योजनाचा घाट घातला जात असल्याच आरोप होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये नोंदणी झालेल्या तसेच, शहरात वास्तव्यास असलेल्या प्रसूत मातांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रसूतीनंतर मातांना पौष्टिक आहार उपलब्ध व्हावा, तसेच नवजात बालिकांना आवश्यक कपडे आणि प्रसाधन साहित्य मिळावे, हा या योजनेचा उद्देश आहे.

अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून प्रसूतीपूर्वी मातांना खुराक, नवजात बालकांना कीट दिले जाते, अशी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. नवीन योजनेवर कोट्यवधी रुपये करण्याचा वेगळा अट्टहास का?, हा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य शासनाच्या अनेक योजनांचा फायदा डीबीटीच्या माध्यमातून दिला जातो. मात्र, महापालिकेत ठेकेदार पोसण्यासाठी असे धोरण राबवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यासाठी नुकतीच ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पौष्टिक खाद्य पदार्थ देणार

प्रसूत मातांसाठीच्या संचामध्ये खारीक, खोबरे, गूळ, फुटाणा डाळ, गावरान तूप, बदाम, खजूर, काजू, आळीव, जवस, तीळ, ओवा, बडीशेप आणि मेथीचे दाणे यांचा समावेश आहे. हे साहित्य दहा किलो क्षमतेच्या कापडी पिशवीतून दिले जाणार आहे. असे दरवर्षी सुमारे ३६ हजार संचांची खरेदी केली जाणार आहे. नवजात मुलींसाठीच्या बाळंतविडा संचात फ्रॉक, झबले, कानटोपी, लंगोट, दुपटे, लोकरीचे स्वेटर, टोपी, पायमोजे, बेबी मसाज ऑईल, बेबी पावडर, पावडर कंटेनर, बेबी सोप आणि आईसाठी मसाज ऑईल अशा १३ वस्तूंचा समावेश आहे. दरवर्षी सुमारे १७ हजार संचांचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ संबंधित मातेच्या पहिल्या दोन नवजात बालिकांसाठीच लागू राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील महिला असणे आवश्यक

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या असून, लाभार्थी माता पिंपरी-चिंचवड शहराची रहिवासी असणे आवश्यक आहे. शहरातील रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात प्रसूती झालेल्या मातांना संबंधित रुग्णालयाच्या प्रमुखांच्या शिफारशीनुसार साहित्य दिले जाणार आहे. लाभार्थ्यांची माहिती आशा सेविका, अंगणवाडी सेविका, नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच, महापालिका आणि खासगी रुग्णालयांतील नोंदणीच्या आधारे संकलित केली जाणार आहे. पुरवठ्यात हलगर्जीपणा केल्यास दंड ठोठावला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT