पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून बेपत्ता झालेल्या 666 महिलांचा ठावठिकाणा लागत नसल्याने यंत्रणेत खळबळ उडाली आहे. दररोज सरासरी पाच महिला शहरातून बेपत्ता होत असल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार बेपत्ता महिलांचा शोध आता ‘मिशन मोड’वर सुरू करण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘मिसिंग सेल’ सक्रिय करण्यात आला आहे. (Pimpari chinchwad News)
राज्य शासनाच्या ‘ऑपरेशन मुस्कान’ व ‘ऑपरेशन शोध’ मोहिमेच्या माध्यमातून बेपत्ता महिलांचा शोध घेतला जात आहे. नुकतेच पार पडलेल्या विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात विरोधकांनी सरकारला जाब विचारला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व पोलिस ठाण्यांमध्ये महिला अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली ‘मिसिंग सेल’ अधिक प्रभावी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ठाणेनिहाय नियोजनबद्ध पद्धतीने शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून मागील दीड वर्षांत 5011 लोक बेपत्ता झाले. यांपैकी 3814 जणांना शोधण्यात पोलिसांना यश आले; मात्र 1197 लोकांचा शोध अद्याप सुरू आहे. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. वर्ष 2024 मध्ये 3212 जण बेपत्ता झाले. त्यामध्ये 1522 महिला होत्या. 1487 महिलांचा शोध लागला असला, तरी 35 महिला अद्याप सापडलेल्या नाहीत.
महासंचालक कार्यालयाच्या आदेशानंतर प्रत्येक पोलिस उपविभागात एका पोलिस उपनिरीक्षकाच्या नेतृत्वाखाली दोन ते तीन कर्मचार्यांचा ‘मिसिंग सेल’ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये एका महिला कर्मचार्याचा समावेश बंधनकारक करण्यात आला आहे. याशिवाय विभागीय अधिकारी दररोज आढावा घेणार असून, उपायुक्त साप्ताहिक आणि पोलिस आयुक्त मासिक आढावा घेणार आहेत.
2025 मध्ये केवळ जुलैपर्यंतच 1799 लोक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यामध्ये तब्बल 1036 महिला आहेत. यांपैकी 673 महिलांचा शोध लागला आहे, तर उर्वरित 363 महिलांचा शोध सुरू आहे. या संख्येवरून शहरातून दररोज सरासरी पाच महिला बेपत्ता होत असल्याचे स्पष्ट होत आहे.