संतोष शिंदे
पिंपरी: शाळेत लवकर पोहोचायचे आहे..., क्लासला निघालोय..., मित्रांसोबत फिरून येतो..., बाजारात जाऊन येतो... अशी विविध कारणे सांगून अल्पवयीन मुले पालकांकडून दुचाकीची चावी मिळवत आहेत. काही पालक तर 'आमच्या मुलाला गाडी उत्तम चालवता येते', असे अभिमानाने सांगत त्यांच्या हातात वाहन सोपवतात; मात्र क्षणिक हट्ट पूर्ण करण्यासाठी घेतलेला हाच निर्णय एका क्षणात एखाद्याचा किंवा स्वतःच्या मुलाचाच जीव धोक्यात घालू शकतो. शिवाय, अशा निष्काळजीपणामुळे पालकांनाही कायद्याच्या कचाट्यात अडकून कारावासापर्यंतची शिक्षा भोगावी लागू शकते.
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे. मागील सहा महिन्यांत अल्पवयीन वाहनचालकांविरोधात ८६ प्रकरणे नोंदविली आहेत. या कारवाईत ४ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केवळ अल्पवयीन वाहनचालकांवरच नव्हे, तर त्यांना वाहन देणारे पालक आणि वाहनमालकांनाही थेट जबाबदार धरून ही कारवाई करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलांना वेगाचे आकर्षण
वाहन चालविण्याचा अनुभव नसणे, वेगाचे आकर्षण, मित्रांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची मानसिकता आणि वाहतुकीच्या नियमांविषयीचे अपुरे ज्ञान यामुळे अल्पवयीनांकडून गंभीर अपघात होण्याची शक्यता अनेकपटीने वाढते. एका क्षणाच्या बेफिकिरीमुळे निरपराध व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते आणि त्यानंतर पश्चात्तापाशिवाय काहीही उरत नाही. त्यामुळे मुलांना वाहतुकीच्या नियमांचे योग्य शिक्षण देणे आणि वाहनांपासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
वाहतूक विभागाचे पालकांना आवाहन
मुलांच्या हातात वाहन देऊन त्यांच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ करू नका, असे स्पष्ट आवाहन वाहतूक पोलिसांनी पालकांना केले आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास नकार देणे हीच जबाबदार पालकाची खरी ओळख असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मुलांना वाहतुकीचे नियम, रस्ते सुरक्षेचे महत्त्व, हेल्मेटची गरज आणि वाहन चालविण्याची कायदेशीर वयोमर्यादा याची योग्य माहिती द्यावी. वाहतूक शिस्तीचे संस्कार घरातूनच सुरू झाले तर अनेक अपघात टाळता येऊ शकतात.
कायदा काय सांगतो?
अल्पवयीन वाहनचालकांबाबत कायदा अत्यंत कठोर आहे. मोटार वाहन कायद्यानुसार १८ वर्षांखालील व्यक्तीला मोटार वाहन चालविण्याची परवानगी नाही. अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी वाहन चालविताना आढळल्यास पालक किंवा वाहनमालकास दोषी मानले जाते. अशा प्रकरणात तीन वर्षांपर्यंत कारावास, २५ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. संबंधित वाहनाची नोंदणी १२ महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद असून, अल्पवयीनास वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स अथवा लर्निंग लायसन्स मिळण्यास बंदी घालता येते. याशिवाय अपघातात एखाद्याचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास प्रकरणाच्या स्वरूपानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांखाली स्वतंत्र गुन्हाही दाखल होऊ शकतो. त्यामुळे अल्पवयीनांच्या हातात वाहन देणे पालकांना गजाआड पोहोचवू शकते.
महाविद्यालय परिसरात नियम पायदळी
शहरातील प्रमुख रस्ते, शाळा आणि महाविद्यालय परिसरात दुपार व संध्याकाळच्या वेळेत अल्पवयीन मुले भरधाव दुचाकी चालवताना दिसतात. ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेटशिवाय वाहन चालविणे, स्टंटबाजी तसेच रस्त्यावर रेस लावणे असे प्रकार सातत्याने आढळून येत आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढत असून रस्त्यावरील इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत आहे.
पालकांनो, हे लक्षात ठेवा...
१८ वर्षांखालील मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्यास देऊ नका.
अल्पवयीन वाहन चालवत असल्यास पालक आणि वाहनमालकावरही कारवाई होते.
अपघात झाल्यास दंडाबरोबरच कारावास आणि इतर कठोर कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.
मुलांना वाहतुकीचे नियम, हेल्मेटचे महत्त्व आणि जबाबदार वाहनचालक होण्याचे शिक्षण द्या.
अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे बेकायदा आणि अत्यंत धोकादायक आहे. पालकांनी मुलांच्या हट्टापेक्षा त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. प्रत्येक पालकाने जबाबदारीने वागल्यास अपघात टाळता येतील.विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड