Pimpri Metro Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Metro: निगडी-पिंपरी मेट्रो मार्गावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांचा जीव धोक्यात

हेल्मेटविना कामगार, क्रेनखाली नागरिकांची वर्दळ, रस्त्यावर उघड्या सळ्या आणि तुटलेली चेंबर्स; प्रवाशांना रोज धोकादायक प्रवास.

पुढारी वृत्तसेवा

बजरंग मासाळ

पिंपरी: शहरात मेट्रोचे जाळे विस्तारत असताना निगडी ते पिंपरी मार्गावर सुरू असलेल्या कामाने सुरक्षिततेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. उंचावर काम करणारे कर्मचारी हेल्मेटविना, क्रेनखाली सुरू असलेली नागरिकांची वर्दळ, रस्त्यावर उघड्या पडलेल्या सळ्या, वाकलेले पत्रे, तुटलेली चेंबर्स आणि महामार्गावर सांडणारे पाणी… अशा एक ना अनेक धोक्यांच्या गर्तेतून नागरिकांना रोजचा प्रवास करावा लागत आहे.

मेट्रोचे काम सुरू असताना कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दुसरीकडे सर्वसामान्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

निगडीत वाऱ्यामुळे मेट्रो पुलाचा पत्रा उडून दुचाकीस्वाराच्या अंगावर पडण्याची वेळ आली होती. सुदैवाने अनर्थ टळला. मात्र, त्या घटनेतूनही संबंधित यंत्रणांनी धडा घेतला की नाही, असा प्रश्न प्रत्यक्ष पाहणीतून समोर आलेल्या धोकादायक परिस्थितीमुळे उपस्थित होत आहे.

हेल्मेटविनाच उंचावर काम कामगारांच्या सुरक्षेचे काय?

मेट्रोच्या पुलावर अनेक फूट उंचीवर कर्मचारी काम करताना दिसतात. मात्र, या कामगारांपैकी काहींच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याचे, तर काही जण आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय काम करत असल्याचे चित्र आहे.

उंचावर काम करताना सुरक्षिततेची साधने वापरणे ही प्राथमिक गरज असताना त्याकडेच दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच सुरक्षा नियमांची आठवण होणार का?

महाकाय क्रेनखाली वर्दळ

मेट्रोच्या कामासाठी हायड्रॉलिक क्रेन आणि अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. मात्र, काही ठिकाणी क्रेनच्या खालीच नागरिकांची ये-जा सुरू असल्याचे दिसते. काम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक सूचना फलक, रिफ्लेक्टर किंवा सुरक्षित अंतर राखण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे कामाच्या ठिकाणाहून जाणारे पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालक थेट धोक्याच्या छायेत आहेत. अवजड यंत्रांच्या हालचालीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची नाही का?

महामार्गावर पाण्याचा सडा; दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला

काही ठिकाणी मेट्रो पुलावरील नवीन स्लॅबच्या कामानंतर त्यावर पाणी मारले जात आहे. मात्र, हे पाणी थेट खाली महामार्गावर पडत असल्याने रस्त्यावर पाण्याचा सडा पडत आहे. वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते.

पाण्यामुळे वाहन घसरण्याची शक्यता असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे का, हा प्रश्न आहे. एका बाजूला उंचावर बांधकाम सुरू असताना दुसऱ्या बाजूला महामार्गावरील वाहतूक सुरक्षित ठेवण्याचे आव्हान संबंधित यंत्रणेसमोर आहे.

बॅरिकेडिंगचा बोजवारा; पत्र्यांचा धोका

मेट्रोच्या कामाभोवती उभारण्यात आलेले पत्र्यांचे बॅरिकेडिंग अनेक ठिकाणी वाकलेले, उचकटलेले आणि अस्ताव्यस्त अवस्थेत आहे. काही ठिकाणी पत्र्यांचे टोक रस्त्याच्या दिशेने बाहेर आले असून, काही ठिकाणी बॅरिकेडिंगची रांगच विस्कळीत झाली आहे.

याच मार्गावरून पीएमपीएमएलच्या बीआरटी बस, दुचाकी आणि अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. वाहनांचा पत्र्यांना घास लागणे किंवा वाऱ्यामुळे पत्रे कोसळणे, अशा घटनांचा धोका कायम आहे. सुरक्षिततेसाठी उभारलेले बॅरिकेडिंगच अपघाताचे कारण ठरणार असेल, तर त्याचा उपयोग काय?

रस्त्यालगत लोखंडी सांगाडे, तुटलेल्या जाळ्या; अपघाताला निमंत्रण

मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी फ्रेम्स, सळ्या आणि सांगाड्यांचा रस्त्यालगतच पसारा पडलेला आहे. काही ठिकाणी हे साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत असून, त्याचे धारदार भाग बाहेर आलेले आहेत. दुसरीकडे सर्व्हिस रोडलगत स्टॉर्म वॉटर लाइनची चेंबर्स आणि त्यावरील जाळ्या तुटलेल्या अवस्थेत दिसतात.

त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या हिरव्या शेडनेटचाही अनेक ठिकाणी केवळ औपचारिक वापर होत असल्याचे दिसते. बांधकामातील साहित्य खाली पडू नये, यासाठी असलेली ही व्यवस्था प्रत्यक्षात किती परिणामकारक आहे, याची तपासणी होण्याची गरज आहे.

मेट्रोच्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत वारंवार प्रशिक्षण दिले जाते. दररोज सकाळी काम सुरू करण्यापूर्वी दहा मिनिटांचे सुरक्षा मार्गदर्शन (टूल बॉक्स टॉक) घेतले जाते. यामध्ये कामाच्या ठिकाणी घ्यावयाची खबरदारी, सुरक्षा साधनांचा वापर आणि संभाव्य धोक्यांची माहिती कर्मचाऱ्यांना दिली जाते. त्यानंतरच कामाला सुरुवात केली जाते. प्रत्येक विभागासाठी तसेच स्थानकनिहाय सुरक्षा व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवली जाते. कुठेही हेल्मेट किंवा अन्य सुरक्षा साधनांचा वापर होत नसल्याचे आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल. नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या जीविताला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्थेची पुन्हा तपासणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या जातील.
- हेमंतकुमार ढवळे, चीफ सेफ्टी एक्स्पर्ट, पुणे मेट्रो.
मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे यापुढे विशेष लक्ष दिले जाईल. कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने वापरण्यास भाग पाडले जाईल. प्रत्येक कामाच्या ठिकाणी देखरेख करणाऱ्या सुपरवायझरला याबाबत स्पष्ट सूचना देण्यात येतील. सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच काम केले जाईल.
- संदीप बोले, मेट्रो देखरेख विभाग पिंपरी चिॅचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT