पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने फेबुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण तसेच पत्राशेडवर कारवाई केली. तसेच नियोजित आरक्षणे मोकळी केली; परंतु साधारण एक वर्ष कालावधी लोटूनही येथे कारवाई करताना जी तत्परता दाखवली तेवढी तत्परता येथील विकास करताना महापालिका प्रशासन दाखवताना दिसून येत नाही. संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालक त्रस्त आहेत.
कुदळवाडीतील नियोजित रस्त्यांचे काम करण्यासाठी महापालिकेच्या वतीने साधारण मे महिन्यापासून काम सुरू आहे. काही किलोमीटरचा रस्ता अद्याप पूर्ण होत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या कामासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचे टेंडर देण्यात आले आहे. परंतु, ठेकेदार अत्यंत संथगतीने काम करत असल्याने कुदळवाडी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने येथील नागरिक व व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कुदळवाडीतील मोरे पाटील चौक ते देहू-आळंदी रस्त्याला मिळणार्ऱ्या रस्त्याचे काम मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू आहे; परंतु अद्याप ते पूर्ण झालेले नाही. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालक, स्थानिक रहिवासी तसेच पादचारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यात विविध विभागांची कामे करण्यास उशीर लागत असल्याने या रस्त्यांची कामे कधी होणार, असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत. ड्रेनेजलाईन टाकून चेंबरसाठी खड्डे खोदण्यात आलेले आहेत. हे खड्डे पाच ते सहा फूट खोल आहेत. तेथे चेंबर बांधण्यात येणार आहेत; परंतु हे कामदेखील संथ गतीने सुरू असल्याने पादचारी, वाहनचालक यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. जेथे खड्डे आहेत तेथे धोकादायक फलक अथवा चारही बाजूने संरक्षक दोरी बांधणे गरजेचे आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
कामासाठी पूर्ण रस्ताच बंद
सध्या कुदळवाडीतील बालघरे वस्तीत पोलिस चौकीच्या शेजारी काम सुरू आहे. येथील काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने पूर्ण रस्ता खोदून बंद केला आहे. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पोलिस चौकी असल्याने येथे नागरिकांचा राबता असतो; परंतु मोरे पाटील चौक ते जाधववाडी, चिखली-आळंदी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने वाहनचालक व नागरिक त्रस्त आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने काम सुरू असल्याने अडचण निर्माण होत आहे.
पथदिव्यांचा खांब रस्ता रोखण्यासाठी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कुदळवाडीत स्ट्रीट लाईटसाठी टाकलेले खांब रस्ता तयार करताना संबंधित ठेकेदारांनी काढून टाकले आहेत; परंतु ते महापालिकेच्या वतीने व्यवस्थित न ठेवल्याने हे खांब रस्त्याच्या कढेल तर काही खांब गायब झाल्याचे दिसून येत आहे. ठेकेदाराचे जीसीबीचालक या खांबांचा वापर रस्ता आडविण्यासाठी करत आहेत. त्याच्यावरून जेसीबी चालविला जात आहे. यामुळे खांब मध्येच मोडले आहेत. परंतु, महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांचा कररुपी पैसा वाया जात आहे.
रात्रीदेखील जेसीबी रस्त्यातच
कुदवाडीवाडी पोलिस चौकीच्या जवळ रस्त्याचे काम सुरू आहे. येथील काम करताना मुरुम रस्त्याच्या मधोमध टाकून रस्ता बंद करण्यात आला. संबंधित ठेकेदाराने रस्त्यातील साहित्य तसेच जेसीबी बाजूला करून रस्ता रहदारीस मोकळा करून देणे गरजेचे असताना पूर्ण रस्ता दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेला आहे. यामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिक त्रस्त आहेत.