Police Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Ganeshotsav Police Security: पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘मेगा’ बंदोबस्त; २,७२७ अधिकारी-कर्मचारी मैदानात!

५५० होमगार्ड, एसआरपीएफच्या दोन प्लाटूनसह १७ स्ट्रायकिंग पथके सज्ज; २,२५१ सार्वजनिक गणेश मंडळांवर पोलिसांची करडी नजर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरात मोठा सुरक्षा बंदोबस्त उभारला आहे. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी तब्बल २ हजार ७२७ पोलिस अधिकारी-कर्मचारी मैदानात उतरविण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीला ५५० होमगार्ड असणार असून एसआरपीएफच्या दोन प्लाटूनसह विविध विशेष पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा २ हजार २५१ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशमूर्तींचे आगमन, प्रतिष्ठापना, दर्शनासाठी होणारी गर्दी आणि विसर्जन मिरवणुका या सर्व टप्प्यांसाठी स्वतंत्र सुरक्षा नियोजन करण्यात आले आहे. गर्दीची ठिकाणे, प्रमुख चौक, संवेदनशील परिसर आणि विसर्जन मार्गांवर अतिरिक्त लक्ष ठेवण्यात येणार आहे.

बंदोबस्ताची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. एक सहपोलिस आयुक्त, एक अपर पोलिस आयुक्त, सहा पोलिस उपायुक्त आणि नऊ सहायक पोलिस आयुक्त उत्सवकाळातील सुरक्षा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणार आहेत. त्यांच्यासोबत ६४ पोलिस निरीक्षक आणि २९१ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक कार्यरत राहणार आहेत. प्रत्यक्ष बंदोबस्ताचा मुख्य भार २ हजार ३५५ पोलिस अंमलदारांवर असणार आहे.

सार्वजनिक मंडळांचा परिसर, प्रमुख रस्ते, गर्दीची ठिकाणे तसेच विसर्जन मार्गांवर त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय ५५० होमगार्डही पोलिसांच्या मदतीसाठी रस्त्यावर असतील. उत्सव काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ प्रतिसाद देता यावा, यासाठी एसआरपीएफच्या दोन प्लाटून राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बॉम्ब शोधक व नाशक पथकाची एक तुकडी, चार आरसीपी आणि १७ स्ट्रायकिंग पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून विसर्जनापर्यंत शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पोलिसांचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

बंदोबस्ताचे मनुष्यबळ

  • सहपोलिस आयुक्त – १

  • अपर पोलिस आयुक्त – १

  • पोलिस उपायुक्त – ६

  • सहायक पोलिस आयुक्त – ९

  • पोलिस निरीक्षक – ६४

  • सहायक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक – २९१

  • पोलिस अंमलदार – २,३५५

  • होमगार्ड – ५५०

  • एसआरपीएफ – २ प्लाटून

  • बीडीडीएस – १

  • आरसीपी – ४

  • स्ट्रायकिंग पथके १७

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी शहरात आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मंडळे, गर्दीची ठिकाणे आणि विसर्जन मार्गांवर पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, विशेष पथकेही सज्ज आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून शांततेत उत्सवाचा आनंद घ्यावा.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT