Ganeshotsav Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Ganeshotsav: ढोल-ताशांच्या गजरात पिंपरी-चिंचवडमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन!

लेझीमचा ताल, फुलांची उधळण अन् ‘मोरया’चा जयघोष; घराघरांत आणि मंडळांत गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: ढोल-ताशांचा गजर... नृत्यात तल्लीन झालेले भक्त...'गणपती बाप्पा मोरया- मंगलमूर्ती मोरया'चा जयघोष... अशा मंगलमय आणि उल्हासपूर्ण वातावरणात गणरायाचे सोमवार (दि. १४) आगमन झाले. घराघरांत आणि सार्वजनिक मंडळात बाप्पाचे थाटात स्वागत करण्यात आले. 'तालबद्ध लेझीम पथके, फुलांच्या पाकळ्यांची मुक्तहस्ते उधळण आणि गणेशभक्तांचा अमाप उत्साह.. अशा उत्साही वातावरणात घरोघरी व मंडळामध्ये गणरायाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी सकाळपासूनच लाडक्या बाप्पाचे आगमन होणार म्हणून भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यंदा हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थीचा दुर्मिळ योग आला होता. मूर्तींच्या स्टॉल्सवर गणरायाला घरी आणण्यासाठी गर्दी झाली होती. तसेच बाजारपेठातही खरेदीसाठी गर्दी झाली होती. घरोघरी गणरायाचं वाजतगाजत आगमन झालं. सार्वजनिक मंडळांपासून घराघरांत आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज विराजमान झाले असून, यंदा बारा दिवसांच्या या उत्साहपर्वाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे.

शहरात सकाळपासून गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी बाजारपेठेत नागरिक व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजेपासून तर तरुणाईचा उत्साह शिगेला पोचला होता. ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमच्या तालावर थिरकणार्‍या मिरवणुकांनी वातावरण जल्लोषमय झाले होते. गणरायाच्या प्रतीक्षेत असलेल्या भक्तांची लगबग सुरू होती. घराघरांमध्ये बाप्पांच्या स्वागतासाठी अबालवृद्धांपासून सर्वांचीच जय्यत तयारी सुरू होती. मंत्रोच्चार तसेच आरत्यांचे स्वर घराघरांतून ऐकू येत होते. घरोघरी दुपारपर्यंत गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली होती.

पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, कासारवाडी, दापोडी परिसरात गणेशमूर्ती घेण्यासाठी भाविक सहकुटुंब आल्याचे दिसून येत होते. बाप्पाला घरी नेण्यासाठी खास पारंपरिक पोषाख परिधान केलेले अनेक कुटुंबीय दिसून आले.

घरोघरी हरितालिका पूजन

महिलांनी आणि कुमारिकांनी आज मनोभावे हरितालिकेचे व्रत केले. चांगला पती मिळावा म्हणून मुलीही हरितालिकेचे व्रत करतात. गणेश चतुर्थी आणि हरितालिका तृतीया या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने महिलांनी सकाळी हरितालिकेची पूजा केली. 'हरितालिका' या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरागत व्रताचे महत्त्व आजही टिकून आहे. 'शिवडी' या फुलाला हरतालिकेच्या पूजेमध्ये महत्त्वातचे स्थान असल्यामुळे बाजारामध्ये ही फुले मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. हरितालिकेच्या व्रतासाठी महिलांनी महादेवाच्या मंदिरांमध्ये, तर काहींनी घरामध्ये वाळूची पिंड तयार करून त्याची पूजा केली.

लहानग्यांचा उत्साह

गणेशोत्सव हा चिमुकल्यांचा अधिक आवडता सण. 'मोरया' अक्षरे लिहिलेल्या पट्ट्या कपाळावर बांधून लाडक्या बाप्पांना आणण्यासाठी चिमुकल्यांची लगबग दिसून येत होती. मूर्ती घेतल्यापासून घरी येईपर्यंत 'गणपती बाप्पा मोरया'चा अखंड गजर चिमुकले करत होते. महिला व मुलींचा सहभागही लक्षणीय होता.

स्वागतासाठी मुली, महिलांची पारंपरिक वेभभूषा

गणरायाला घरी आणण्यासाठी महिलांची गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येपासून लबगब सुरू होती. सोमवारी सकाळीदेखील गणपती आगमनासाठी महिला पारंपरिक वेशभूषेत गणरायाचे स्वागत करण्यास सज्ज होत्या. त्यांच्याबरोबर घरातील लहान मुलीदेखील रेडिमेड नऊवारी, नथ, माळा घालून नटून-थटून सज्ज झाल्या होत्या.

मोदकांचा दरवळ

बाप्पाला नैवेद्य म्हणून घरोघरी बनविण्यात आलेल्या मोदकांचा दरवळ सुटला होता. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर चिमुकल्यांनी मोदकांवर यथेच्छ ताव मारला. सोमवारपासून बारा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खायला मिळणार यामुळे बच्चेकंपनी खुशीत दिसत होती.

पूजा साहित्य खरेदीस गर्दी

सकाळपासून गणपतीची मूर्ती तसेच विविध पूजा साहित्य नेण्यासाठी बाजार परिसरात गर्दी केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती; मात्र वाहतूक पोलिसांकडून योग्य नियोजन केले होते. ठिकठिकाणी बंदोबस्त असल्यामुळे कोंडी नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT