पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय पक्षांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामध्येच आता प्रभागातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या मागणी होवू लागली आहे. प्रभाग क्रमांक 9 गांधीनगर-खराळवाडी परिसरातील (अनुसूचित जाती राखीव) मध्ये प्रमुख इच्छुक उमेदवार आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांना विरोध होऊ लागला आहे.
गेल्या 18 वर्षांच्या काळात गांधीनगर परिसराला स्थानिक नगरसेवक मिळालेला नसल्याने, या वेळी अनुसूचित जाती राखीव प्रवर्गातून स्थानिक उमेदवार उभा करण्याची संधी मिळत असल्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत आहे.
या प्रभागातून सिद्धार्थ बनसोडे हे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे; मात्र या प्रभागातील स्थानिकांतून प्रभागाबाहेरील व्यक्तींना उमेदवारी देऊ नका, अथवा प्रभागाची चिंता नसलेल्या व्यक्तींना उमेदवारी देऊ नका अशी मागणी, त्या त्या राजकीय पक्षांनी प्रमुखांकडे केली असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापूर्वी बैठकही झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रभागामध्ये बाहेरून अनेकांना उमेदवारी देऊनही विकास झाला नाही.
त्यामुळे अनेक समस्या आजही गांधीनगर- खराळवाडी प्रभाग परिसरातील सुटलेल्या दिसत नाहीत. स्थानिक उमेदवार निवडून आल्यास प्रभागातील अनेक दीर्घकालीन प्रश्न मिटू शकतील आणि विकासाची गती वाढेल, असा विश्वास या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाने स्थानिक उमेदवारालाच तिकीट दिले पाहिजे, आणि जर कोणत्याही पक्षाने बाहेरील उमेदवाराला तिकीट दिले तर त्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय या ठिकाणी काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.