पिंपरी: शनिवारी दुपारनंतर आणि रविवारी सकाळपासून शहरातील अनेक पेट्रोल पंप अचानक बंद दिसू लागल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. पेट्रोल संपले, सेवा तात्पुरती बंद, नो स्टॉक, असे फलक अनेक पंपांवर झळकू लागल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर, काही वाहनचालकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागली.
नागरिकांकडून अतिरिक्त इंधन भरण्याचा प्रयत्न
दरम्यान, अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संभम वेगाने पसरत असल्याचे दिसून आले. काही नागरिकांनी खबरदारी म्हणून अतिरिक्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्याने अनेक पंपांवर अनावश्यक गर्दी वाढली. परिणामी आधीच कमी असलेला साठा आणखी वेगाने संपत असल्याचे चित्र आहे.
शहरात निर्माण झालेल्या या संभमाच्या पार्श्वभूमीवर इंधन कंपन्या आणि प्रशासनाने अधिकृत माहिती देत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी पुरवठा आणि व्यवस्थापनातील बदलांचा परिणाम थेट वाहनचालकांवर होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
पहिल्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचा पुरवठा कमी झाला आहे. आधी काही पंपांना क्रेडिट सिस्टिमवर टँकर मिळत होते; पण आता ती व्यवस्था बंद केली आहे. पेमेंट झाल्याशिवाय टँकर सोडला जात नाही. पूर्वी मिळणारा डबल टँकर आता मिळत नाही. सध्या फ्युल शॉर्टेजची परिस्थिती आहे.राजेश गावडे, पेट्रोल पंप मालक, चिंचवड
रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी बाहेर पडलो; पण सलग दोन पेट्रोल पंप बंद पाहून धक्का बसला. सोशल मीडियावर आधीच विविध चर्चा सुरू असल्याने काही वेळ नेमके काय सुरू आहे हेच समजत नव्हते. कार्यालयीन कामासाठी दररोज प्रवास करावा लागतो.देवदत्त पडवळ, नोकरदार