पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व लहान-मोठे असे एकूण 143 नाले सफाईला सुरुवात करण्याची सूचना आरोग्य विभागाने आठही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील एप्रिल महिनाभरात सर्व नाले स्वच्छ करण्यात येणार आहेत.
शहरामध्ये 2 ते 11 मीटर रुंदीचे 100 किलोमीटर अंतराचे एकूण 143 नैसर्गिक नाले आहेत. हे नाले शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांना जाऊन मिळतात. सर्वच नाले उघडे असल्याने या नाल्यांमध्ये राडारोडा, प्लास्टिक, भंगार व टाकाऊ साहित्य फेकले जाते. अनेक नागरिक कचरा या नाल्यांमध्ये टाकतात. या नाल्यात गाळ साचल्याने नाले अरुंद व उथळ होतात. परिणामी पावसाळ्यात पाणी वाहून नेण्याची त्यांची क्षमता कमी होते. पावसाळ्याचे पाणी वाहून न गेल्याने ते साचून परिसरातील घर, हाऊसिंग सोसायट्या व दुकानांमध्ये शिरते. त्यात नागरिकांचा मोठे नुकसान होते.
पावसाळ्यामध्ये शहरात पूर स्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाकडून दरवर्षी सर्व नाले, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या (स्ट्रॉम वॉटर लाईन), चेंबर्स आणि गटार स्वच्छ केले जातात. गेल्या वर्षी पावसाळ्यात चिखली, रूपीनगर, पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी, पिंपरीतील भाटनगर, दापोडी, चिंचवड गावासह अनेक भागांत पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यास सुरूवात झाली आहे.
साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाला सुरुवात होते. मात्र, गतवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे उन्हाळ्यातच हे काम पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्थापत्य विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत कळविण्यात आल आहे. नालेसफाई कामकाजाची माहिती गुगल स्प्रेडशिटमध्ये दर आठवड्याला भरून किती टक्के नालेसफाई झाली, याची अद्ययावत माहिती द्यावी, अशी सूचनाही आरोग्य विभागाने केली आहे.
तीस एप्रिलपर्यंत सर्व नाले साफ करणार
नालेसफाई करण्याच्या सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने सफाई केली जाईल. ज्याठिकाणी अरुंद नाले आहेत, तिथे मशिन जात नाही अशा नाल्यांमध्ये सुरक्षेची सर्व साधने वापरून मनुष्यबळाद्वारे सफाई करण्याच्या योग्य त्या सूचना दिल्या आहेत. नालेसफाईपूर्वीचे व नंतरचे छायाचित्रे घेतली जाणार आहेत. प्रत्येक आठ दिवसांनी नालेसफाईची आढावा घेण्यात येणार आहे. 30 एप्रिलपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.