पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांगांना दरमहा 2 हजार 500 रुपये अर्थसाह्य (पेन्शन) दिली जाते. तो खर्च 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे समाज विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना ते वित्तीय अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे आता दिव्यांगांना वेळेत अर्थसाह्य मिळू शकेल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
महापालिकेच्या पंडित दिनदयाल उपाध्याय-दिव्यांग कल्याणकारी (अर्थसाह्य) योजनेंअतर्गत शहरातील दिव्यांगांना दरमहा 2 हजार 500 रुपये पेन्शन दिली जाते. समाज विकास विभागाकडून ही पेन्शन दिली जाते. समाज विकास विभागाच्या प्रमुखाना 25 लाख रुपये कामांना तसेच, खर्चाचे वित्तीय अधिकार आहेत. अतिरिक्त आयुक्तांना 1 कोटी तर, आयुक्तांना 1 कोटी रुपयांपुढील खर्चास तसेच, कामाचे वित्तीय अधिकार आहेत.
पेन्शनची रक्कम दरमहा 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असते. त्या रकमेसाठी आयुक्तांची प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे दरमहा दिव्यांगांना पेन्शन देण्यात अडचणी येत आहेत. परिणामी, तक्रारींची संख्या वाढली आहे. हे टाळण्यासाठी तसेच, दरमहा दिव्यांगांना पेन्शन मिळावी, म्हणून या योजनेसाठी अतिरिक्त आयुक्तांना 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे वित्तीय अधिकार प्रदान करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्या निर्णयास स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे दिव्यांगांना दरमहा वेळेत पेन्शन मिळेल, असा दावा समाज विकास विभागाच्या अधिकार्यांनी केला आहे.