Cyber crime fraud 60 victims daily
संतोष शिंदे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस भयावह रूप धारण करत आहे. नॅशनल सायबर क्राईम या पोर्टलवर 1 जानेवारी ते 31 जुलै 2025 या सात महिन्यांत तब्बल 13 हजार 472 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
म्हणजेच दररोज सरासरी 60 नागरिक सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असूनही नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. हे चित्र चिंताजनक असून प्रत्येक नागरिकाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. (Latest Pimpri News)
हिंजवडी, वाकड परिसर ‘हॉटस्पॉट’
हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर सर्वाधिक म्हणजेच 1 हजार 958 तक्रारी नोंद झाल्या आहेत. आयटी कंपन्या, स्टार्टअप्स, परप्रांतीय तरुणांची वर्दळ, डिजिटल पेमेंट्सचा जास्त वापर ज्यामुळे हा परिसर सायबर चोरट्यांसाठी ’हॉटस्पॉट’ ठरत आहे. आयटी पार्कच्या नजीक वाकड पोलिस ठाण्यात 1 हजार 934 तक्रारी दाखल झाल्या असून, हा भागही सायबर चोरट्यांसाठी संधी उपलब्ध करून देत आहे. यापाठोपाठ आयटीपासून जवळ असलेल्या सांगवी पोलिस ठाण्यात 1 हजार 199 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
उच्चशिक्षितही बळी
सायबर गुन्हा केवळ अशिक्षित किंवा ग््राामीण भागापुरता मर्यादित राहिला नाही. आयटी कंपन्यांत कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित तरुणांनाही मोठ्या प्रमाणावर फसवले जात असल्याचे समोर येत आहे. दररोज नवनवीन तंत्र वापरणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे आमिष सुशिक्षितांनादेखील भुरळ घालत आहे. ऑनलाईन गुंतवणुकीवर जास्त परतावा, केवायसी अपडेट, बँक खाते ब्लॉक किंवा सोशल मीडिया हॅक अशा मोडसला आयटी अभियंतेदेखील बळी पडल्याची उदाहरणे आहेत.
आयुष्यभराची पुंजी गमावली
सायबर गुन्ह्यात फसलेले पीडित पोलिसांकडे धाव घेतात. काहींनी आयुष्याची संपूर्ण बचत गुंतवणुकीच्या नावाखाली गमावली. तर काहींनी केवळ मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक केल्यामुळे बँक खात्यातील रक्कम गमावली आहे. एका घटनेत निवृत्त व्यक्तीने आयुष्यभराची साठवलेली रक्कम स्वतःच्या हलगर्जीपणामुळे गमावल्याचे समोर आले आहे.
सात महिन्यांचे आकडे बोलके
एकूण तक्रारी (जानेवारी-जुलै 2025) : 13,472
हिंजवडी पोलिस ठाणे : 1,958
वाकड पोलिस ठाणे : 1,934
सांगवी पोलिस ठाणे : 1,199
चिंचवड पोलिस ठाणे : 931
भोसरी पोलिस ठाणे : 718
निगडी पोलिस ठाणे : 561
फसवणुकीच्या नवनवीन मोडस्
केवायसी अपडेटच्या बहाण्याने फसवणूक. यामध्ये बँक खाते बंद होईल, असे सांगून लिंक पाठवली जाते.
इन्व्हेस्टमेंट स्कीम सांगून सुशिक्षित नागरिकांना टार्गेट केले जाते. जास्त परताव्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये बळकावले जातात.
सोशल मीडिया हॅक करण्याचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे. यामध्ये फेसबुक-इन्स्टाग््रााम हॅक करून मित्रांकडून पैसे मागितले जातात.
लॉटरी आणि गिफ्ट स्कॅम पोलिसांची मोठी डोकेदुखी ठरत आहेत. यामध्ये ’मोठी रक्कम जिंकली आहे’, असे सांगून फसवले जाते.
’ओटीपी शेअरिंग’ या मोडसद्वारे फसवणूक होण्याचे प्रमाणही जास्त आहे. या मोड्समध्ये अनोळखी कॉलवर दिलेला एकच ओटीपी खात्यातील सर्व पैसे उडवून टाकतो.
सायबर गुन्हेगार अत्यंत चलाख असून फसवणुकीसाठी दररोज नवनवीन पद्धत वापरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे. अनोळखी इसमांना वैयक्तिक माहिती, ओटीपी, कार्ड डिटेल्स देऊ नयेत. अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे. शंका आल्यास तत्काळ 1930 या राष्ट्रीय हेल्पलाईनवर किंवा जवळच्या सायबर पोलिसांकडे संपर्क साधावा.- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, पिंपरी