Pimpri Chinchwad Garbage Problem Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Garbage Problem: पिंपरीत स्वच्छतेचे फलक असूनही कचऱ्याचे ढीग; स्मार्ट शहर दाव्यांवर प्रश्नचिन्ह

घंटागाड्यांमधून कचरा सांडतोय, प्रशासनाकडून केवळ आश्वासने; नागरिकांचा नाराजीचा सूर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहराला स्वच्छ आणि स्मार्ट शहर म्हणून घडविण्यासाठी महापालिकेकडून विविध मोहिमा राबविल्या जातात. सार्वजनिक ठिकाणी येथे कचरा टाकू नका, कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे फलक लावले जातात. मात्र, प्रत्यक्षात या फलकांखालीच कचऱ्याचे ढीग साचलेले असून, त्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये स्वच्छतेच्या घोषणांपेक्षा अस्वच्छतेचे वास्तव अधिक ठळकपणे दिसत असून. प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.

आरोग्य, सुरक्षिततेचाही प्रश्न

रस्त्यावर पडलेला ओला कचरा हा केवळ स्वच्छतेचा विषय नाही. त्यातून अपघातांचा धोकादेखील निर्माण होतो. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अशा ठिकाणी घसरण्याचा धोका वाढतो. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. तसेच, साचलेल्या कचऱ्यामुळे डास, माश्या आणि इतर रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

घंटागाड्यांमधूनही सांडतोय कचरा

शहरातील कचरा संकलन व्यवस्थेतही अनेक त्रुटी दिसून येत आहेत. अनेक घंटागाड्या आणि कचरा वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा अधिक कचरा भरून नेत असल्याचे आढळून आले. परिणामी वाहतुकीदरम्यान काही ठिकाणी कचरा रस्त्यावर सांडत असल्याचे दिसते. ओला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर घनकचरा रस्त्यावर पडल्याने परिसर अस्वच्छ होतो. अनेकदा हा सांडलेला कचरा तातडीने उचलला जात नसल्याने नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

फलक स्वच्छतेचे, वास्तव कचऱ्याचे

शहरातील विविध चौक, रस्ते आणि मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकण्यास बंदी असल्याचे फलक उभारण्यात आले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, परिसर स्वच्छ ठेवावा आणि नियमांचे पालन करावे यासाठी हे प्रयत्न केले जातात. मात्र, अनेक ठिकाणी हे फलक केवळ औपचारिकता ठरत असल्याचे दिसून आले. कारण ज्या ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई आहे, त्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आढळून आले. या प्रकारामुळे फलकांचा धाक राहिलेला नसल्याचे स्पष्ट होते. नियम आहेत, सूचना आहेत; पण त्यांची अंमलबजावणी मात्र दिसत नाही. परिणामी शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत कचरा टाकण्याची समस्या वाढताना दिसत आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

काही ठिकाणी संबंधित यंत्रणा परिसरात उपस्थित असल्याचे दिसून आले. मात्र, कचरा साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तो वेळोवेळी उचलण्यावरच भर दिला जात असल्याचे जाणवले. त्यामुळे मूळ समस्या कायम राहत असून, त्याच ठिकाणी पुन्हा कचरा साचत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेचे उद्दिष्ट केवळ कचरा उचलणे नसून, कचरा टाकण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणे हेदेखील असायला हवे. मात्र, अनेक भागांमध्ये यादृष्टीने प्रभावी यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसत नाही.

स्वच्छतेच्या दाव्यांना वास्तव्याचा धक्का

स्वच्छ सर्वेक्षण, स्मार्ट सिटी आणि स्वच्छ शहराच्या घोषणांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा उल्लेख अभिमानाने केला जातो. मात्र, शहरातील अनेक भागांमध्ये दिसणारी ही परिस्थिती त्या दाव्यांना धक्का देणारी आहे. कचरा टाकण्याची चुकीची सवय असलेल्या नागरिकांवर नियंत्रण आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी याशिवाय ही समस्या सुटणे कठीण आहे. स्वच्छतेचे फलक उभारणे हा उपायाचा केवळ एक भाग आहे. त्यामागे सातत्यपूर्ण देखरेख, जनजागृती, दंडात्मक कारवाई आणि जबाबदारीची अंमलबजावणी आवश्यक आहे. अन्यथा स्वच्छतेचे संदेश फलकांपुरतेच मर्यादित राहतील आणि शहरातील अस्वच्छतेचे वास्तव बदलणार नाही.

महापालिकेने कचरा टाकू नका म्हणून फलक लावले आहेत; पण त्याच ठिकाणी दररोज कचरा साचलेला दिसतो. त्यामुळे नागरिकांमध्येही चुकीचा संदेश जातो. फक्त फलक लावून उपयोग नाही. तर, नियमांचे काटेकोर पालन आणि कारवाईही झाली पाहिजे. स्वच्छ शहरासाठी नागरिक आणि प्रशासन दोघांनीही आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे.
गिरिधर लोणकर, स्थानिक नागरिक
शहरातील विविध भागांमध्ये नियमितपणे कचरा संकलन केले जाते. नागरिकांनी घरगुती कचरा घंटागाडीतच द्यावा आणि सार्वजनिक ठिकाणी टाकू नये, यासाठी जनजागृती केली जात आहे. ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो, त्या ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीमही सुरू आहे.
डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त आरोग्य विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT