पिंपरी : जिममध्ये व्यायामानंतर ब्रेक घेत असताना एका ३७ वर्षीय युवकाला अचानक भोवळ आली आणि काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १) सकाळी सातच्या सुमारास चिंचवड येथे घडली. मिलिंद कुलकर्णी (३७, रा. चिंचवड) असे मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून चिंचवड येथील नायट्रो जिममध्ये नियमित व्यायाम करत होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी व्यायाम केला. त्यानंतर थोडा ब्रेक घेत त्यांनी पाणी प्यायले. त्याचवेळी काही कळायच्या आतच त्यांना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. जिममधील प्रशिक्षक आणि उपस्थित सदस्यांनी तातडीने त्यांना जवळील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.