पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामकाजातील गोंधळामुळे सत्ताधारी भाजपची नाहक बदनामी होत आहे. पदाधिकार्यांमध्ये समन्वय नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्या प्रकाराची भाजप प्रदेश कमिटीने दखल घेतली आहे.
त्यानुसार भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी महापौर रवी लांडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांची गुरूवारी (दि. 28) बैठक घेत त्यांचे कान टोचले. कामकाजात सुधारणा करा; अन्यथा कारवाईस सामोरे जा, असा थेट इशारा दिला आहे.
या ना त्या कारणांमुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभा तसेच, इतर कामकाजाबाबत सत्ताधारी भाजप चर्चेत येत आहे. सभाशास्त्राची वारंवार तोडफोड केली जात आहे. प्रमुख पदाधिकार्यांमध्ये समन्वय नसल्याने असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पदाधिकार्यांवर शहरभरातून टीका होत आहे.
त्यातून विरोधकांना टीका करण्यासाठी आयते कोलित मिळत आहे. शहरासाठी संबंधित नसलेल्या विषयांवर थेट सर्वसाधारण सभा महिना-महिना तहकूब केली जात आहे. सभा कामकाज नियमितपणे होत नसल्याने तसेच, सभागृहात पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये समतोल नसल्याने सत्ताधारी नगरसेवकही नाराज आहेत.
या संदर्भात दैनिक पुढारीने 'सभा आम्ही चालवतो की, पदाधिकारी?' पक्षातील एकाधिकारशाही घातक; नगरसेवकांची अंतर्गत नाराजी- असे ठळक वृत्त २२ ऑगस्टला प्रसिद्ध केले होते. त्यावरून शहरभरात जोरदार चर्चा झाली. त्याबाबत भाजप प्रदेश कमिटीने तीव्र नाराजी व्यक्त करत शहर कोअर कमिटीला फैलावर घेतले. महापालिकेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालवले गेले नाही तर, कठोर भूमिका घ्यावी लागले, असा निर्वाणीचा इशारा कमिटीने दिला आहे.
त्यानंतर खडबडून जागे झालेल्या कोअर कमिटीने शहरासाठी काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. शहर पातळीवरील विषय आमदार, शहराध्यक्ष व इतर प्रमुख पक्ष पदाधिकार्यांच्या समोर जातील. तर, महापालिकेसंदर्भातील निर्णय महापौर, सत्तारूढ पक्षनेते, व स्थायी समितीचे अध्यक्ष हे घेतील. त्याबाबत त्या त्या स्तरावर कार्यवाही करावी. त्यात कोणी ढवळाढवळ करणार नाही.
कोअर कमिटीच्या निर्णयानुसार शहराध्यक्ष काटे यांनी आज महापौर, सत्तारुढ पक्षनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्षांची एक विशेष बैठक घेतली. महापालिकेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालवा. शहर विकासाचे प्रस्ताव तातडीने मंजूर केले पाहिजेत.
विनाकारण सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला जाऊ नये. मेट्रो, ई-आरटीएस मार्गास मंजुरीसह पार्किग व शौचालय धोरण शहरासाठी महत्वाचे आहेत. आवश्यक विषयांना त्या-त्या वेळी मंजुरी देऊन महापालिकेचे कामकाज सुरळीत चालले पाहिजे. त्यासंदर्भात सर्व प्रमुख पदाधिकार्यांनी समन्वय ठेवून काम केले पाहिजे. तसे न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुढील महिन्यात नगरसेवकांना प्रशिक्षण
सभागृहात नवख्या नगरसेवकांची संख्या सर्वांधिक आहे. सर्व 128 नगरसेवकांना सभाशास्त्र कामकाजाबद्दल प्रशिक्षण दिले जाणार आहे. ते प्रशिक्षण पुढील महिन्यात भाईदर, मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत देण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.
विषयपत्रिकेवर स्वीकृत नगरसेवकांचा विषय कसा आला माहीत नाही
स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय सत्ताधार्यांनी दप्तरी दाखल केला होता. त्यामुळे तो विषय तीन महिन्यांनतर सभागृहापुढे येऊ शकतो. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेसमोर हा विषय कसा आला हे, माहिती नसल्याचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे व सत्तारूढ पक्षनेते शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सभेचे विषय पक्षाकडून ठरवले जात नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. तर, महापौरांनी पत्र दिल्याने तो विषय सभागृहाच्या पटलावर घेण्यात आल्याचे नगर सचिव विभागाने सांगितले. येत्या 17 सप्टेंबरच्या सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाईल, असा दावा शहराध्यक्ष काटे यांनी केला आहे.
पाण्यासाठी भाजप आग्रही
पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुन्हा एक अंतिम बैठक लावली जाणार आहे. वाढत्या पिंपरी-चिंचवडसाठी शहराला पाणी आवश्यक असून, तो प्रकल्प खूप महत्वाचा आहे. त्याबाबत भाजप सकारात्मक आहे. तसेच, भामा आसखेड पाणी योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे, असे शहराध्यक्ष काटे यांनी सांगितले.
महापालिका पदाधिकार्यांनायोग्य त्या सूचना केल्या
महापालिकेचे कामकाज सुरळीत चालावे. शहर विकासाबाबत पदाधिकार्यांनी समन्वय ठेवून कामकाज करावे. आपल्या वर्तनातून पक्षाची प्रतिमा मलिन होऊन नये, दक्षता घ्यावी, अशा सूचना महापालिका पदाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत आज एक बैठक घेतली, असे भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
शहर विकासाच्या प्रस्तावांना तत्काळ मंजुरी देणार
शहरासंदर्भातील विषय तातडीने मंजूर केले जाणार आहे. शहर विकासाला अडथळा होऊ नये म्हणून तसा निर्णय घेण्यात आला आहे. पार्टी मीटिंगमध्ये झालेल्या निर्णयाविरोधात कोणी गेल्यास त्या नगरसेवकांवर कारवाई केली जाणार आहे. मेट्रो ही शहराची गरज आहे. लोकवस्तीतून मेट्रो नेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी सूचना कराव्यात. उड्डाणपूल तुटणार की नाही, याकडे लक्ष देऊ नये. शहरात मेट्रोचे जाळे तयार करण्याचे नियोजन आहे, असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.