पिंपरी: फुगेवाडीतील विषारी दारूकांडात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील गावठी दारू, हातभट्टी, अवैध मद्यनिर्मिती, साठवणूक आणि विक्री यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्वतंत्र ‘ॲन्टी बुटलेगिंग कक्ष’ (दारूबंदी पथक) स्थापन करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या कक्षाला केवळ अवैध दारू व्यवसायावर कारवाई करण्याचेच नव्हे तर अशा धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही नजर ठेवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
फुगेवाडी दारूकांडानंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कथित अवैध दारू व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची यंत्रणा उभारण्यात आली आहे. वरिष्ठांकडून वेळोवेळी सूचना देऊनही अवैध दारूधंदे सुरू असल्याचे आढळून आल्याने आयुक्तालयाने हा निर्णय घेतला आहे.
कक्षाची रचना कशी असेल?
ॲन्टी बुटलेगिंग कक्षात एक पोलिस निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक आणि 15 पोलिस अंमलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पथकासाठी लागणाऱ्या वाहनांसह अन्य आवश्यक साधनसामग््राीची व्यवस्था सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे 1) करणार आहेत.
हा कक्ष गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली कार्यरत राहणार असून, त्याच्या कामकाजावर सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे 1) यांची देखरेख आणि पोलिस उपआयुक्त (गुन्हे) यांचे पर्यवेक्षण राहणार आहे. कक्षाचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक काम पाहणार असून, ते दैनंदिन कामकाजाबाबत वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहेत.
गुप्त माहिती गोळा करून कारवाई
या कक्षाचे मुख्य काम अवैध दारू व्यवसायाबाबत गुप्त माहिती गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे हे असेल. गावठी दारू आणि हातभट्टीच्या निर्मितीपासून ते साठवणूक, वाहतूक आणि विक्रीपर्यंत संपूर्ण साखळीचा माग काढण्यावर भर दिला जाणार आहे. फक्त विक्रेते किंवा वाहतूकदारांवर कारवाई न करता या व्यवसायामागील सूत्रधार, आर्थिक लाभ घेणारे प्रमुख व्यक्ती आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरही प्रभावी कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
फुगेवाडी दारूकांडानंतर कठोर भूमिका
फुगेवाडीतील विषारी दारूकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. या घटनेनंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध दारूविरोधात विशेष मोहीम सुरू केली होती. अनेक ठिकाणी छापे टाकून हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. तर, काही पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली.
त्यानंतर आता स्वतंत्र ॲन्टी बुटलेगींग कक्ष स्थापन करून अवैध दारू व्यवसायाविरोधातील कारवाई अधिक आक्रमक आणि संघटित पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अवैध दारू व्यवसायाचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने या कक्षाची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये कोणतीही हयगय अथवा दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
रॅकेटची साखळी शोधणार
साधारणपणे छाप्यात जप्त झालेल्या दारूपुरती कारवाई मर्यादित राहत असल्याची टीका होत असते. मात्र, नव्या कक्षाला जप्त करण्यात आलेली दारू कुठून आली, ती कोणाकडून पुरवण्यात आली आणि पुढे कोणाकडे विक्रीसाठी जाणार होती, याचा सखोल तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अवैध दारूच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेऊन त्याचे मूळ उखडून टाकण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यामुळे केवळ किरकोळ आरोपी नव्हे तर मोठे पुरवठादार आणि रॅकेट चालवणारे मास्टरमाइंडही पोलिसांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
सराईतांची स्वतंत्र यादी
अवैध दारू व्यवसायात वारंवार सहभागी होणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा स्वतंत्र अभिलेख तयार करुन तो सतत अद्ययावत ठेवला जाणार आहे. अशा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाया, तडीपारी, एमपीडीएसारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई आणि अन्य कायदेशीर उपाययोजना करण्याचे अधिकार या कक्षाला असतील.
गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार
अवैध दारू व्यवसायाशी संबंधित गंभीर, क्लिष्ट किंवा मोठ्या स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार या कक्षाकडे वर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे दारू तस्करी, मोठ्या प्रमाणावरील पुरवठा साखळी किंवा विषारी दारू प्रकरणांसारख्या गुन्ह्यांचा तपास अधिक केंद्रित पद्धतीने होणार आहे.
पोलिसांवरही राहणार नजर
या कक्षाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अवैध दारू व्यवसायाला पोलिस यंत्रणेतील कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत मिळत असल्याचे आढळल्यास त्यांच्याविरोधातही अहवाल सादर केला जाणार आहे. संबंधित दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगात्मक आणि कायदेशीर कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व प्रकारच्या अवैध दारू व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ॲन्टी बुटलेगिंग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत अवैध दारू निर्मिती, साठवणूक, वाहतूक व विक्री यांवर प्रभावी प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे.- रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड