हवेची गुणवत्ता घसरली..! पिंपरी-चिंचवडची प्रदूषण रोखणारी यंत्रणा कुचकामी File Photo
पिंपरी चिंचवड

Air Pollution: हवेची गुणवत्ता घसरली..! पिंपरी-चिंचवडची प्रदूषण रोखणारी यंत्रणा कुचकामी

महापालिकेच्या पर्यावरण अहवालातील माहिती

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जवळपास 200 कोटी रुपये खर्च केले आहेत. तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकापेक्षा शहर परिसरात धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे; तसेच ध्वनी प्रदूषणातही वाढ झाल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आले आहे.

वाहनांची वाढती संख्या, वाढते औद्योगिकीकरण, बदलेले राहणीमान यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे करोडो रुपये खर्च करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेकडून केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट होते. (Latest Pimpri News)

पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरण क्षेत्रातील स्थितीचा मागोवा घेणारा 2024-25 चा पर्यावरण अहवाल काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये शहरातील वायू प्रदूषणातील काही प्रदुषके ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या विहीत नमुन्यापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.

या अहवालात क्षेत्र आणि लोकसंख्या, हवामानातील बदल, पर्जन्यमान, पाणीपुरवठा, नदी-नाले-तलावांची सद्यस्थिती, जलनि: स्सारण योजना व मैलाशुद्धीकरण प्रकल्प, हवेतील व ध्वनी प्रदूषणाचे स्तर, मृदा गुणवत्ता, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा वापर, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था, स्मार्ट सिटी प्रकल्प, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्याने, उद्योगधंदे, आपत्ती व्यवस्थापन, शहर नूतनीकरण योजना आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

मागील काही वर्षांत पिंपरी-चिंचवड महापलिका क्षेत्रात सुरू असलेली विविध विकासकामे, बांधकामे व उद्योगधंदे यातून निर्माण होणारी धूळ हवेत पसरते; तसेच धुलीकणांच्या प्रमाणातही वाढ होऊन शहरातील हवा प्रदूषित होत आहे.

शहर परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. या सर्व यंत्रणेद्वारे शहरातील धुलीकण कमी करण्याच्या उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जात आहे; मात्र ही वाहने शहरामध्ये अभावानेच आढळून येत आहेत. या यंत्रणेव्दारे हवेतील धुलीकण जड बनवून ते जमिनीवर आणले जातात. त्यामुळे हवेची आर्द्रता व तापमान कमी होते; तसेच वातावरण थंड राहण्यास मदत होते. तरीही शहरामध्ये धुळीचे प्रमाण कमी झालेले नाही.

महापालिकेने दिल्लीच्या धर्तीवर नवीन संकल्पना राबवून वायू, जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून नवनवीन संकल्पना राबविल्या आहेत. मात्र, दिल्ली, मुंबई, पुणे आणि आता पाठोपाठ औद्योगिक नगरी असलेले पिंपरी-चिंचवड हे हवेच्या खराब गुणवत्तेत अग्रेसर होत आहे. पिंपरी-चिंचवडचा विचार करता खराब रस्ते, वाढती बांधकामे, औद्योगिक आणि शहरी कचरा जाळण्याचे प्रकार व त्यातच कमी झालेले हरित क्षेत्र व ढासळलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सर्व गोष्टींमुळे पिंपरी- चिंचवडकरांचा श्वास कोंडत आहे. शहरातील काही भागात प्रदूषणामुळे शहराची हवा खराब श्रेणीत गेल्याचे दिसून येत आहे.

वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे धुलीकण

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 19 लाख वाहने आहेत. या वाहनातून निघाणार्‍या धुरामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धुलीकण पसरतात; तसेच नायट्रोजन ऑक्साईड या प्रदूषित घटकाच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहनांची संख्या, अपुरी मल:निस्सारण सुविधा, त्यातच वाढत जाणार्‍या झोपडपट्ट्या यामुळे शहरतील वायू प्रदूषण गंभीर स्वरूप धारण करत आहे.

शहरामध्ये मागील काही कालावधीत बांधकामांत मोठी वाढ झाली आहे. विकासकामेदेखील सुरू आहेत. तसेच आरएमसी प्लांटमुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे.
- संजय कुलकर्णी (मुख्य अभियंता)
महापालिका पर्यावरण विभागाला हवेचे प्रदूषण म्हणजे काय हेच बहुतेक माहीत नसावे. त्यामुळे करोडो रुपये खर्च करून आणि खर्चिक चुकीच्या उपाययोजना करूनदेखील हवेचे प्रदूषण वाढले आहे. पालिकेचे मेकॅनिकल शिपिंग मशीन सगळ्यात जास्त धूलिकण वाढवत आहेत. त्याच प्रमाणे मोडकळलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि औद्योगिक कचरा जाळण्याचे प्रमाण वाढतच जात आहे.
- प्रशांत राऊळ ( ग्रीन आर्मी, अध्यक्ष)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT