बजरंग मासाळ
पिंपरी: शहराच्या विकासाची धुरा सांभाळणाऱ्या सरकारी यंत्रणांकडून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याची अपेक्षा केली जाते; मात्र याच सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली असल्याचे वास्तव पिंपरी अजमेरा कॉलनीतील डब्ल्यू सेक्टरमधील पीडब्ल्यू वसाहतीची झाली आहे. इमारतींना वरवर रंगरंगोटीचा मुलामा दिलेला असला, तरी आतमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत आढळून आले.
मोकळ्या जागांमध्ये गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून कचरा व गवताचे ढीग साचलेले आहेत. परिसरात भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. तुटलेल्या गेटमुळे श्वान थेट इमारतींच्या परिसरात आणि घरांच्या जवळपर्यंत पोहोचत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ड्रेनेज चेंबर तुंबले; सांडपाणी थेट घराजवळच
वसाहतीतील ड्रेनेज चेंबर तुंबलेले असल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या लाइन तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सांडपाणी थेट इमारतीखाली पडत असल्याची स्थिती आहे. सांडपाणी आणि घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यातच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे रहिवासी सांगतात. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे रहिवासी सांगतात.
बाहेर रंगरंगोटी; आत तुटलेले दरवाजे-खिडक्या
शासकीय वसाहतीतील इमारतींवर रंगरंगोटी करण्यात आली असली, तरी आतील समस्यांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी खिडक्या आणि दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. जिन्यांचीही दुरवस्था झाली आहे. सांडपाणी आणि ड्रेनेजच्या पाइपलाइनची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे ‘इमारतीला रंग देणे म्हणजे देखभाल पूर्ण झाली का, असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करत आहेत.
परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी रहिवाशांवरच
वसाहतीतील रहिवाशांना परिसरातील अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढलेले गवत, कचरा, झाडाझुडपे आणि दुर्गंधी यामुळे अनेकदा रहिवाशांनाच पुढाकार घेऊन परिसर स्वच्छ करावा लागतो, अशी त्यांची तक्रार आहे. सरकारी निवासस्थानांची देखभाल करण्यासाठी संबंधित यंत्रणा असताना रहिवाशांनीच स्वच्छतेची जबाबदारी उचलण्याची वेळ येत असेल, तर देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
झाडांची मुळे थेट घरांच्या दिशेने
वसाहतीतील काही इमारतींना अक्षरशः खेटून वड, पिंपळ यांसारखी झाडे वाढली आहेत. झाडांच्या फांद्या इमारतींच्या भिंती आणि टेरेसपर्यंत पोहोचल्या आहेत. मुळे भिंतींच्या दिशेने वाढत असून काही ठिकाणी घरांच्या दिशेने शिरत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. जुन्या इमारतींना लागून वाढणाऱ्या मोठ्या झाडांची वेळेत छाटणी किंवा आवश्यक ती कार्यवाही न झाल्यास भविष्यात इमारतीच्या बांधकामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा केवळ सौंदर्याचा प्रश्न न राहता निवासस्थानाच्या सुरक्षिततेशी संबंधित मुद्दा बनला आहे.
खेळाचे मैदान नाही; मोकळ्या जागेचा उपयोग कशासाठी?
वसाहतीत लहान मुलांसाठी खेळाचे मैदान किंवा व्यवस्थित खेळाची जागा नसल्याचीही तक्रार आहे. उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये गवत आणि कचरा वाढल्याने त्या जागांचा वापर करणेही कठीण झाले आहे. एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था, तर दुसरीकडे त्यांच्या कुटुंबीयांसाठी मूलभूत सुविधा नसल्याचे चित्र या वसाहतीत पाहायला मिळत आहे.
दिव्याखाली अंधार
पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून राज्यातील सरकारी इमारती आणि सरकारी मालमत्तांची देखभाल केली जाते. मात्र, अजमेरा येथील या शासकीय वसाहतीतील परिस्थिती पाहता देखभाल करणाऱ्या व्यवस्थेच्या वसाहतीची दुरवस्था झाली असल्याचे पाहणीत आढळून आले.
सरकारी कर्मचाऱ्यांना निवास देणे पुरेसे नाही त्या घरात सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण देणेही शासनाचीच जबाबदारी आहे. आम्हाला सुरक्षीत जीवन जगण्यासाठी शासनाने याकडे गांभीर्याने पाहावेरहिवासी महिला