STP Action Housing Societies Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC STP Action Housing Societies: पिंपरी-चिंचवडमध्ये 24 सोसायट्यांचे नळजोड तोडले

एसटीपी न चालवल्याने महापालिकेची धडक कारवाई; पर्यावरण नियम मोडणाऱ्यांवर कारवाई तीव्र

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्या व आस्थापनांना मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) कार्यान्वित करून पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भात महापालिकेने वारंवार नोटीसा देऊनही शहराती 24 हाऊसिंग सोसायट्यांचे नळजोड आत्तापर्यंत तोडण्यात आले आहेत. ही धडक कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शहरात मैलासांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आणि आस्थापनांतील खासगी एसटीपी सुरू करण्याबाबत महापालिकेकडून सातत्याने पाठपुरावा तसेच, कारवाई सुरू आहे. शहरात सध्या एकूण 106 एमएलडीचे 494 खासगी एसटीपी आहेत. त्यापैकी केवळ 83 एमएलडी क्षमतेची 369 एसटीपी सुरू अहेत. तर, 23 एमएलडी क्षमतेची 125 केंद्रे अद्याप बंद असल्याचे आढळून आले आहे. सुरू नसलेल्या एसटीपी केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित हाऊसिंग सोसायट्यांना महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत तांत्रिक सहाय्य करण्यात येत आहे. तसेच, एसटीपी सुरू करण्याबाबत 125 पैकी 99 सोसायट्यांना महापालिकेकडून तीन वेळा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

काही प्रकरणांमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून एसटीपी केंद्रांचे सोसायट्यांना हस्तांतरण करण्यात अडचणी येत आहेत. अशा सोसायट्यांच्या बाबतीत पर्यावरण विभागामार्फत सुनावण्या घेऊन मार्ग काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, प्रथम ते तृतीय नोटीस देऊनही 99 सोसायट्यांकडून एसी सुरू करण्यात आलेले नाहीत. महापालिकेमार्फत कार्यान्वित नसलेल्या एसटीपी केंद्रांची तसेच, नाल्यात किंवा स्टॉर्म वॉटरलाईनमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या हाऊसिंग सोसायट्यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वारंवार सूचना आणि नोटिसा देऊनही आवश्यक कार्यवाही न केल्यामुळे पहिल्या टप्प्यात एसटीपी बंद असलेल्या 62 पैकी 24 हाऊसिंग सोसायट्यांचे नळजोड तोडण्यात आले आहे. तसेच, 4 सोसायट्यांकडून एसटीपी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. तीन सोसायट्यांमध्ये एसटीपी सुरू असल्याचे आढळून आल्याने त्याचे नळजोड तोडण्यात आले नाहीत. तर 3 सोसायट्यांमध्ये एसटीपी अद्याप बांधकाम व्यावसायिकांकडून सोसायटीकडे हस्तांतरित न झाल्यामुळे अशा बांधकाम व्यावसायिकांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. संबंधित सोसायट्यांनी आपली एसटीपी केंद्र तातडीने कार्यान्वित करून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करावा. नळजोड खंडीत करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

या सोसायट्यांचे नळजोड तोडले

आकुर्डीतल ऐश्वर्यम हमारा, उद्योगनगर, चिंचवडमधील पलास रिदम, रावेतमधील सक्सेस इन्फा सोसायटी, आनंदबन हाऊसिंग सोसायटी, साई सरोज, आदित्य मल्हार सोसायटी, रेन्बो विस्टा, मंगल विश्व, जाधववाडी, मोशीतील जी. के. पॅलासिओ फेज टू, चिखलीतील शुभ कलश सोसायटी, जयहिंद रेसिडन्सी, वाकडमधील सिल्व्हर स्कायस्केप, सोनिगरा केशर, पुनावळेतील जी. के. रोज मॅनसेन सोसायटी, वर्धामान प्लॉम रोज, कस्पटेवस्ती वाकडमधील ग््राीन व्हॅली, ताथवडेतील अझुरे म्हाडा, पिंपळे सौदागर येथील अलकेव्ह सोसायटी, रोज आयकॉन सोसायटी, थेरगावमधील सोलाना सोसायटी, ताथवडेतील मिलेनियम ॲक्रोपोलिस, रहाटणी गावठाणातील रॉयल एलिजन्स, रहाटणीतील साई क्रिस्टल, पिंपळे गुरव येथील ओरियाना सोसायटी या हाऊसिंंग सोसायट्यांचे नळजोड तोडण्यात आले आहेत.

हाऊसिंग सोसायट्यांनी नियमितपणे एसटीपी सुरू ठेवावा

शहरातील जलसंपत्तीचे संवर्धन व नदी प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपी केंद्र सुरू ठेवणे बंधनकारक आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. महापालिकेकडून संबंधित हाऊसिंग सोसायट्यांना तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन दिले जात असूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील. नागरिकांनी पर्यावरणपूरक व जबाबदार भूमिका घेत एसटीपी केंद्र नियमितपणे सुरू ठेवावीत, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

ड्रेनेजलाईनमध्ये सांडपाणी

एसटीपी असल्यामुळे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर होत नसून, फ्लशिंग, बाग यांसारख्या पिण्याव्यतिरिक्त वापरासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे. काही सोसायट्यांकडून मैलासांडपाणी थेट किंवा पंपाच्या सहाय्याने नजीकच्या नाल्यात, स्टॉर्म वॉटर लाईनमध्ये किंवा महापालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नदी प्रदूषणात वाढ होत असून, पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT