पिंपरी: आरटीईअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026 - 27 साठी शहरातील खासगी शाळांत आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया लागू असणाऱ्या शाळांची नोंदणीप्रक्रिया 9 ते 19 जानेवारीदरम्यान राबविण्यात आली. सोमवारी शेवटच्या आरटीई प्रवेशास पात्र असणाऱ्या 263 शाळांपैकी फक्त 99 शाळांची आरटीईसाठी नोंद झाली आहे. शाळांची नोंदणी संख्येत वाढ होण्यासाठी 27 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
आकुर्डी विभागातून 47 आणि पिंपरी विभागातून 26 शाळांनी नोंदणी केली आहे. शाळा नोंदणी झाल्यानंतर प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहे. मात्र, अकरा दिवसांत नोंदणीला शाळांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे. यंदा पालिकेच्या निवडणुकांच्या कामकाजामध्ये शाळांचे शिक्षक आणि पालिकेचे कर्मचारी गुंतल्याने शाळा नोंदणीसाठी कमी प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदाही शाळा नोंदणीस 27 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
‘आरटीई’अंतर्गत शहरातील शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सर्व शाळांचे मॅपिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘आरटीई’तून प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवून घेतले जातील. पालकांना शाळांचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल आणि त्यानुसार त्यांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश मिळतील.