Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Municipal Secretary Dispute: पीसीएमसीत नगर सचिवांवरून गोंधळ; सभेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह

दोन नगर सचिवांमुळे प्रशासकीय तांत्रिक घोळ; सर्वसाधारण सभेचे निर्णय रद्द होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या दोन नगर सचिव कार्यरत आहेत. कंत्राटी नगर सचिव उल्हास जगताप यांनी महापालिका सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका तयार केली. तर, सभेचे प्रत्यक्ष कामकाज महापालिका आस्थापनेवरील नगर सचिव मुकेश कोळप यांनी पाहिले. दोन-दोन नगर सचिव असल्याने निर्माण झालेल्या तांत्रिक घोळामुळे सोमवारच्या (दि.15) सर्वसाधारण सभेचे कामकाज नियमाला धरून होते का?, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

महापालिका सभेचे कामकाज व्यवस्थित चालत नाही, असा आरोप करीत महापौर रवी लांडगे यांनी कंत्राटी नगर सचिव नियुक्त करण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या होता. त्यानुसार आयुक्तांनी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात निवृत्त अतिरिक्त आयुक्त तथा नगर सचिव उल्हास जगताप यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे त्यांची एका वर्षासाठी कंत्राटी नगर सचिव म्हणून 18 मे रोजी आयुक्तांनी निवड अंतिम केली. जगताप हे 20 मे रोजी महापालिकेत सुरू झाले. तर, महापालिकेचे अधिकृत नगर सचिव मुकेश कोळप यांची ग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून आयुक्तांनी तडकाफडकी बदली केली.

त्यावर स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी पहिल्याचा आक्षेप घेतला. दहा जूनच्या स्थायी समिती सभेला उल्हास जगताप यांच्या उपस्थितीवर त्यांनी आक्षेप नोंदवला. जगताप यांना वित्तीय अधिकार नसल्याने ते स्थायी समितीचे आर्थिक विषयसंबंधीचे कामकाज करू शकत नाही. त्याबाबत आता राज्य शासनाचे मार्गदर्शन मागण्यात आले आहे. तोपर्यंत मुकेश कोळप हे स्थायी समितीचे कामकाज पाहतील, अशी भूमिका बारणे यांनी घेतली आहे. त्यानुसार त्या दिवसाची स्थायी समिती सभा मुकेश कोळप यांच्या नियंत्रणाखाली पार पडली.

सभेचे कामकाज वाया जाण्याची भीती

दरम्यान, कंत्राटी नगर सचिव जगताप यांनी 15 जूनच्या सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका तयार केली. त्या विषयपत्रिकेवर त्यांची स्वाक्षरी आहे. मात्र, उल्हास जगताप रजेवर असल्याने त्या सभेचे कामकाज नगर सचिव कोळप यांच्या नियत्रंणाखाली झाले. तसेच, स्थायी समितीची बुधवारी (दि. 17) होणार्‍या सभेची विषयपत्रिकाही जगताप यांनी तयार केली आहे. विषयपत्रिका बनवणारे नगर सचिव वेगळे आणि प्रत्यक्ष सभेचे कामकाज घेणारे नगर सचिव वेगळे आहेत. या विचित्र परिस्थितीमध्ये सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेचे कामकाज नियमाला धरून होते का, असा तांत्रिक मुद्दा महापालिका वर्तुळात उपस्थित केला जात आहे. ती सभा अनधिकृत ठरल्यास त्या सभेत घेण्यात आलेले सर्व निर्णय रद्द होऊ शकतात. परिणामी, त्या दिवसाचे सभा कामकाज वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पालिकेत एकाच पदावर दोन अधिकारी कार्यरत

मुकेश कोळप हे पिंपरी चिंचवड महापालिकेत आस्थापनेवरील नगर सचिव आहेत. तर, कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेले नगर सचिव उल्हास जगताप हे आहेत. त्यामुळे महापालिकेत सध्या एकाच पदावर दोन अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे कोणते नगर सचिव खरे आणि अधिकृत आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. त्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे ठोस उत्तर नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सभागृह कामकाजाचा गोंधळ निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT